पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने धडक कारवाई करत सराईत इराणी टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत मुख्य आरोपी फिदा हुसैन मानूअली, मुकेश अरुण नेटके यांच्यासह इतर साथीदारांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून तब्बल ३५ लाख ३३ हजार रुपये किंमतीचे २७ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे.

शहरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विविध तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत या टोळीचा माग काढला. अखेर मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील सोनसाखळी चोरीचे १५ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत लाखोंमध्ये असून, यामुळे अनेक गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींनी पिंपरी चिंचवडसह इतर शहरांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असून मालमत्ता गुन्हे विरोधी पथक आरोपींची सखोल चौकशी करत आहे. या यशस्वी कारवाईबद्दल पिंपरी चिंचवड पोलिसांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, शहरातील गुन्हेगारीवर लगाम लावण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.





















Join Our Whatsapp Group