पिंपरी (Pclive7.com):- वाकड मेन चौक (स.नं.१) येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य अश्वरूढ पूर्णाकृती शिल्प उभारून परिसर सुशोभित करण्यात यावा, तसेच त्या ठिकाणी नागरिकांसाठी बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत उभारण्यात यावी, अशी मागणी नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त मा. डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे केली.

वाकड मेन चौकातील पिंपरी चिंचवड महापालिका माध्यमिक विद्यालय (मुलं-मुली) ही शाळा लवकरच नव्या ठिकाणी स्थलांतरित होणार असून, या जागेचा लोकहितार्थ आणि शहराच्या सौंदर्यवृद्धीसाठी उपयोग व्हावा, या उद्देशाने सदर मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य अश्वरूढ शिल्प हे तरुण पिढीस प्रेरणादायी ठरेल. तसेच वाकड परिसराच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवात भर घालणारे ठरेल. यासोबतच उर्वरित जागेवर “बहुउद्देशीय प्रशासकीय इमारत“ उभारून तलाठी कार्यालय, कर संकलन कार्यालय, वीज वितरण कार्यालय, पोस्ट ऑफिस, दवाखाना, आधार कार्ड केंद्र आदी नागरिकोपयोगी कार्यालयांचा समावेश करण्यात यावा, अशीही मागणी करण्यात आली आहे.

वाकड परिसर हा झपाट्याने विकसित होणारा व वाढत्या लोकसंख्येचा भाग असल्याने नागरिकांना सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यास मोठी सुविधा निर्माण होणार असल्याचे नगरसेविका सौ. स्नेहा रणजित कलाटे यांनी यावेळी सांगितले. या मागणीबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित जागेची पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.




















Join Our Whatsapp Group