पिंपरी (Pclive7.com):- पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तसेच घाटमाथ्यावर सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून, धरण 96 टक्के भरले आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून नदीपात्रातील विसर्गात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पवना धरणातून सध्या नदीपात्रात 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असल्याने आज (24 जुलै) दुपारी 3 वाजल्यापासून सांडव्याद्वारे 3420 क्युसेक अतिरिक्त विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीपात्रातील एकूण विसर्ग 4820 क्युसेकपर्यंत पोहोचणार आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पावसाचे प्रमाण आणि धरणातील पाण्याची आवक लक्षात घेता हा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून 7500 क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती वेळोवेळी जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे पवना नदी तसेच ओढे-नाल्यांच्या पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नदीपात्रातील शेती अवजारे, कृषी पंप, जनावरे तसेच इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प पवनानगर यांनी केले आहे.




















Join Our Whatsapp Group