पिंपरी (Pclive7.com):- स्व. मा. उपमुख्यमंत्री लोकनेते अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीनिमित्त आयोजित जनसेवा सप्ताहाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला शहराध्यक्ष प्रा. कविता संदेश आल्हाट यांच्या वतीने महिलांसाठी कॅन्सर विषयक जनजागृती व मार्गदर्शन व्याख्यान, मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच महिला सक्षमीकरण प्रशस्तीपत्र वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमात डॉ. सौ. माधुरी आल्हाट (एम.डी. फिजिशियन), डॉ. श्री. रोहिदास आल्हाट (स्त्रीरोगतज्ज्ञ) तसेच डॉ. प्रेरणा गोपाळे यांनी महिलांना कॅन्सरची लक्षणे, प्रतिबंध, वेळेवर निदान, उपचार आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित महिलांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला.

शिबिरात सहभागी झालेल्या महिलांची हिमोग्लोबिन (HB) तपासणी तसेच रक्तातील साखरेची (Sugar Level) तपासणी मोफत करण्यात आली. अनेक महिलांनी या आरोग्य तपासणीचा लाभ घेत आपल्या आरोग्याविषयी आवश्यक वैद्यकीय सल्ला प्राप्त केला.

यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा महिला सक्षमीकरण प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. आरोग्य जनजागृती आणि महिला सन्मान यांचा सुंदर संगम घडविणाऱ्या या उपक्रमाला माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमास शहर उपाध्यक्ष युवा उद्योजक अतिशजी बारणे, कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांच्यासह विविध मान्यवर, तज्ज्ञ डॉक्टर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने माता-भगिनी उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्रा. कविता संदेश आल्हाट यांनी उपस्थित सर्व मान्यवर, डॉक्टर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सहभागी झालेल्या सर्व माता-भगिनींचे आभार मानले. “निरोगी महिला म्हणजे सशक्त कुटुंब आणि सशक्त कुटुंब म्हणजे सक्षम समाज” या संकल्पनेतून महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणासाठी असे समाजोपयोगी उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.




















Join Our Whatsapp Group