पिंपरी (Pclive7.com):- फुगेवाडी-दापोडी येथील विषारी दारू प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, एकाच दिवसात तब्बल २३ धडक कारवाया करत ११ महिलांसह २९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या किरकोळ दारू विक्री, अवैध दारू निर्मिती आणि ताडी विक्रीच्या अड्ड्यांवर पोलिसांनी एकाचवेळी छापेमारी केली. पिंपरी, एमआयडीसी भोसरी, आळंदी, तळेगाव एमआयडीसी, देहूरोड, चाकण, महाळुंगे, चिंचवड, रावेत, हिंजवडी आणि सांगवी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही व्यापक मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईत अवैध दारू विक्रीच्या २० प्रकरणांमध्ये सुमारे ७०० लिटर दारू जप्त करण्यात आली. तसेच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी महात्मा फुले नगर परिसरातील एका सलूनच्या आडोशाने सुरू असलेल्या ताडी विक्री केंद्रावर छापा टाकून १०० लिटर ताडी जप्त केली.

दरम्यान, दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोयाळी आणि नाणेकरवाडी येथे सुरू असलेल्या दोन अवैध दारूभट्ट्यांवरही पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणी दारू निर्मितीसाठी भिजत ठेवलेले सुमारे २२०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.
विषारी दारू प्रकरणानंतर पोलिसांनी बेकायदेशीर दारू व्यवसायाविरोधात ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारल्याचे दिसून येत आहे. अवैध दारूची निर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधातील ही मोहीम आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.




















Join Our Whatsapp Group