पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेकडून २४४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही क्षेत्रीय सर्वेक्षण टिम घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण करित आहेत. शुक्रवार दि.२० मार्च अखेर शहरातील ७४ हजार ९९८ घरांची पाहणी करण्यात आली असून २ लाख ४९ हजार २१८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत दि.२० मार्च अखेर परदेशातून प्रवास करुन शहरात आलेल्या ६१३ जणांना ‘होम क्वॉरंटाईन’मध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभाागाकडून देण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दि.२० मार्च पर्यंत शहरातील एकुण १०५ व्यक्तींचे कोरोना (कोविड १९) करीता घश्यातील द्रव्यांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. तर शहरात आज अखेर १२ कोरोनाचे ‘पॉझिटिव्ह’ रूग्ण आढळले आहेत. वायसीएम तसेच भोसरीतील माहापालिकेच्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, शहरातील उद्योजकांची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बैठक घेवून कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्याकरीता प्रशासनाने निर्गमित केलेले सुचना व आदेशांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोना आजाराचे संक्रमण थांबविण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच फ्लुसारखी लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.
परदेश प्रवास करुन चीन, डेमोक्रेटिक रिपब्लीक ऑफ कोरिया, फ्रान्स, जर्मनी, स्पेन, इटली, इरान, दुबई, सौदी अरेबिया, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कतार, ओमान, कुवेत आणि युनाटेड अरब अमिरात या देशांमधुन आलेल्या सर्व नागरिकांनी किमान १४ दिवस स्वत:हून घरांमध्येच (Home Quarantine) मध्ये रहावे. उपरोक्त नमूद देशांमधून प्रवास करुन आलेल्या नागरिकांनी याबाबतची माहिती आपल्या घराजवळील महापालिकेच्या दवाखाना किंवा रुग्णालयात तातडीने द्यावी असे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत हेल्प लाईन कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर हेल्पलाईन क्रमांक ८८८८००६६६६ हा आहे. तसेच ९९२२५०१४५० हा Whatsapp क्रमांक कार्यान्वित करण्यात आलेला आहे. राज्य शासनामार्फत कार्यान्वित idsp.mkcl.org या संकेतस्थळावर संशयित कोरोना रुग्ण संबंधित माहिती देण्याचे आवाहन नागरीक तथा सर्व वैद्यकीय व्यावसायिक यांना करण्यात येत आहे.






















Join Our Whatsapp Group