पिंपरी (Pclive7com):- संपूर्ण देशावर कोरोनाचं मोठं संकट ओढावलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातही दिवसेंदिवस कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत आहे. प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पिंपळे सौदागरमधील भाजपाचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सामाजिक भान ठेवत वाढदिवस साजरा न करता कोरोना विरूध्दचा लढा आणखीन तीव्र करण्याचा निश्चय केलायं. चला संकल्प करूया.. ‘कोरोनामुक्त’ पिंपरी चिंचवड करूया..अशी साद घालत त्यांनी एक कळकळीची विनंती सर्वांना केली आहे. आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने कसलेही होर्डिंग, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, केक यावर खर्च करू नका. त्यापेक्षा नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोनाच्या या संकटात गरजूंना मदतीचे जे सामाजिक कार्य उभे केले आहे, त्याला हातभार लावण्यासाठी स्वेछेने आपल्याला जमेल तशी मदत करावी असे आवाहन शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.
शत्रुघ्न काटे यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की,जन्मदिवस..(२०एप्रिल) अर्थातच वयामधे एक वर्षाची भर घालणारा आणि उरलेले आयुष्य एक वर्षाने कमी करणारा दिवस.. प्रत्येकाच्या मनात आपल्या जन्मदिनाच्या दिवशी आनंद असतो उत्साह असतो. माझ्याही दृष्टिने या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे. साहजिकच राजकीय क्षेत्रात काम करताना समाजकारणाला महत्व देत विधायक कार्य करण्याचा जो वसा मला माझ्या पूर्वजांकडून मिळाला आहे त्याचा आदर्श नजरेसमोर ठेवूनच मार्गक्रमण करत आहे.. आणि हे कार्य करत असताना आपल्या सारख्या थोरा मोठ्यांची मित्रपरिवाराची तसेच कुटुंबाची लाभलेली साथ, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा ही बहुमूल्य आहे.. माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने आपण देत असलेल्या आशीर्वादरूपी शुभेच्छा याची मला अनुभूति देतात.. परंतु जन्मदिवस साजरा करत असताना मात्र माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या मनात आनंदाबरोबरच एक खंत मात्र डोकावत असते ती म्हणजे आपले वय वाढत असताना आयुष्यातले काम करण्याचे एक वर्ष कमी होत आहे, आपल्या सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होण्याचे एक वर्ष कमी होत आहे. म्हणूनच मनाशी मी कायम एक संकल्प केला आहे की परमेश्वर मला जे काही आयुष्य देईल ते मी समाजहितासाठीच खर्ची घालेन.
आपल्या सर्वांशी संवाद साधण्याचा हेतु एवढाच आहे की पुर्ण जग कोरोना विषाणुमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करत आहे, अनेक कुटुंबे उध्वस्त होत असताना वेगवेगळ्या संकटांचा सामना करत आहेत आणि अशा परीस्थितीमधे (२०एप्रिल) रोजी येणारा माझा जन्मदिवस मी किंवा आपण सर्वानी साजरा करणे कदापि उचित ठरणार नाही.. माझ्या कुटुंबाची मला शिकवण आहे की एखाद्याच्या सुखात एकवेळ मागे उभे राहिलात तरी चालेल पण दुःखात मात्र त्याचा हात हातात घेवुनच उभे रहा..
म्हणूनच माझी आपणा सर्वाना एक कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून माझ्या जन्मदिनाच्या निमित्ताने कसलेही होर्डिंग, पुष्पगुच्छ, भेटवस्तू, केक यावर खर्च करू नका.. त्यापेक्षा आपण सर्वाना मी नम्रतापु:र्वक आवाहन करतो की “नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या” माध्यमातून कोरोनाच्या संकटात गरजूंसाठी जे सामाजिक कार्य उभे केले गेले आहे, त्याला हातभार लावण्यासाठी आपण स्वेछेने आपल्याला जमेल तशी मदत करावी.. आणि त्याहूनही मोठि मदत म्हणजे सगळ्यांनी लॉकडाउन मधे घरातच राहून कोरोना विषाणुची प्रसार साखळी तोडण्यासाठी पोलिस, प्रशासन व पर्यायाने आपणा सर्वांची मदत करावी. मला नक्कीच आपल्यावर विश्वास आणि खात्री आहे की आपणही या संकटाचा सामना करण्यासाठी माझ्या बरोबरीने उभे राहून माझी साथ द्याल..!
आपलाच जनसेवक
श्री शत्रुघ्न उर्फ बापु सिताराम काटे