पिंपरी (Pclive7.com):- कोरोना काळात पिंपरी चिंचवडमधील भाजपाच्या आमदारांनी पीएम फंडासाठी निधी दिला. त्यांनी या संकट काळात शहरासाठी किती निधी दिला असा सवाल उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील आणि कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्यावर प्रसिध्दीपत्रकाव्दारे निशाना साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेला राज्य शासनाने ३३ टक्के पेक्षा जास्त खर्च असणारे १७०० कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र त्यातील बहुतांश कामे केवळ एका विधानसभा मतदारसंघातील असल्याने पडद्यामागच्या सुत्रधाराचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे त्यांनी महापौर व पक्षनेता यांना पुढे केले. जे दुसऱ्याच्या आकलेने चालतात त्यांनी आम्ही काय अक्कल शिकवू. शहरातील एकमेव राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांनी कोविड १९ काळात शहरासाठी ४१.५० लाख दिले, एका खाजगी बँकेच्या सीएसआर ४० लाख दिले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून २ कोटी २५ लाख निधी दिला.
तरी भाजपचे पदाधिकारी म्हणतात राज्य सरकारने दीड कोटी रुपये दिले. उलट पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी भाजपला महापालिकेची सत्ता दिली. त्या भाजपचे दोन कारभारी आमदारांनी कोरोनाच्या काळात किती निधी दिला हे जाहीर करावे. तसेच शहरातील एकाच मतदारसंघात १७०० कोटीचा निधी का नेला हेही जाहीर करावे. भाजपने मोठ्या पदांवर विराजमान केले व प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या महापौर व पक्षनेते यांना आपल्याच महानगरपालिकेची माहिती नाही हे शहराचे दुर्भाग्य आहे. आकड्यांचा खेळ करणाऱ्या भाजपने दुसऱ्याच्या अकलेचे तारे मोजण्यापेक्षा स्वतःचे ज्ञान तपासून पहावे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.
कारभाऱ्यांनी पीएम फंडासाठी आमदार निधी पाच लाख रुपये दिले. पुणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय मंत्री असताना केंद्राकडून शहरासाठी त्यांनी कोरोनासाठी किती निधी आणला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विचारलेल्या प्रश्नांमुळेच भाजप पदाधिकाऱ्यांशी धांदल उडाली आहे. त्यामुळे महापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांची कोविड रुग्णालयांच्या गाठीभेटी चालू आहेत. पिंपरी चिंचवड शहरात जवळपास ७५ हजार रुग्ण आहेत व शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित असणार्या रुग्णांना जागा मिळत नाही हे वास्तव आहे.
महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार साधारण 1000 ऑक्सिजन बेड महापालिकेचे उपलब्ध आहेत. शहरातील मृत्यू दर 1.75 % आहे. मग यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे असे वाटत नाही का? प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे पण या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यापेक्षा विरोधकांच्या आरोपांच्या मिरच्या कोणाला झोंबल्या. 33 टक्के निर्बंध हटवून शासनाने १७०० कोटी रुपयांच्या विकास कामासाठी मंजुरी दिली हे वास्तव सत्य आहे असे म्हटले आहे.
केंद्राकडून जीएसटी परतावा मिळवण्यासाठी भाजप आमदारांनी हालचाली कराव्यात..!
केंद्र शासनाकडे महाराष्ट्र राज्याचा हजारो कोटी रुपयांचा जीएसटी परतावा निधी येणे बाकी असून त्यातील शेकडो कोटी रुपये पिंपरी-चिंचवड शहराचे सुद्धा आहेत. त्यामुळे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केंद्र शासनाकडून हे पैसे लवकरात लवकर येण्यासाठी आग्रह धरावा. आज आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्याच्या काळात केंद्रातील भाजप व पिंपरी चिंचवडमधील भाजप यांच्यामुळेच दिवाळखोरीत निघू शकते. जेष्ठनेते शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यात व आपल्या शहरात ऐंशीव्या वर्षी सुद्धा फिरत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी मागील नऊ महिन्यात जेवढ्या बैठका घेतल्या असतील तेवढ्या भाजपने मागील पाच वर्षात घेतल्या नसतील. भाजपचे नेते शहरात विरोधकांची अक्कल तपासण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा केंद्राकडून जीएसटी परतावा मिळविण्यासाठी खर्च करावी असा टोला वाघेेरे व शितोळेे यांनी भाजपच्या त्या पडद्यामागच्या सूत्रधारांना लगावला आहे.






















Join Our Whatsapp Group