पिंपरी (Pclive7.com):- मोशी-चिखली येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूल मध्ये मातृदिन अनोख्या पध्दतीने ऑनलाईन साजरा करण्यात आला.
आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझी. मूल उदरात असल्यापासून ते जीवात जीव असेपर्यंत आपल्या मुलांवर अपार प्रेम करणारी दैवी कलाकृती म्हणजे आई. आई या शब्दाची फोड करताना आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशीच केली जाते.
वास्तविक आईविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी एखाद्या खास किंवा विशिष्ट दिवसाची गरज नाही. मात्र, आईला समर्पित असलेला मातृ दिवस विशेष करून आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला गेला.
सुरवातीला रुडयार्ड किपलिंग यांच्या “ईश्वर सर्व ठिकाणी असत नाही त्यामुळेचं त्याने आईला बनविले” या सुप्रसिद्ध वाक्याची विद्यार्थ्यांना आठवण करून देण्यात आली.
भारतीय संस्कृतीमध्ये आईला सर्वांत वरचे स्थान आहे. आई सर्वश्रेष्ठ गुरू मानली गेली आहे. म्हणूनच मातृदेवो भवः असे म्हटले जाते. ऋषी वशिष्ठांनी वर्णन केलेली आईची महती सांगण्यात आली. दहा उपाध्यायांपेक्षा एक आचार्य श्रेष्ठ आहे. शंभर आचार्यांपेक्षा एक पिता श्रेष्ठ आहे आणि एक सहस्र पित्यांपेक्षा एक माता ही अधिक श्रेष्ठ आहे.
मातेला ईश्वर स्थानी मानून, एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्या आईचे पाद्यपूजन करण्यात आले. तिचे औक्षण करून, तिलक लावून तिच्या कडून आशीर्वाद घेण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या शब्दात कृतज्ञता व्यक्त करताना स्व:हस्ताक्षरात शुभेच्छापत्र बनवून आईस दिली. सर्व विद्यार्थी आणि मातांनी आदर पूर्वक सहभाग घेतला.
मदर्स डे म्हणजेच मातृ दिन साजरा करण्याची सुरुवात मूळात अमेरिकेतून झाली. अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या एना जार्विस यांचे आपल्या आईवर अपार प्रेम होते. आईवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनीच या दिवसाची सुरुवात केल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक वर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृ दिवस जगभरात साजरा केला जातो.
आधुनिक संसाधनांद्वारे आणि नाविन्यपूर्ण पद्धतींने इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमधील शिक्षक अभ्यास घेत असले तरी, अभ्यासाचे निरक्षण आणि परीक्षण हे आईलाच करावे लागते. इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमधील पाल्यांच्या आईने तांत्रिक अडचणीवर मात करून, कौशल्य अवगत करून, मुलांच्या या ऑनलाईन अभ्यासाला सुसह्य बनविले आहे.
याप्रसंगी संचालिका कमला बिष्ट यांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. ऑनलाईन असलेल्या या अविस्मरणीय उपक्रमात सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गावर उपस्थित राहून संस्काराचे धडे गिरवले. देबोश्री भोंडवे, दिशा कंसारा, चंद्रकला कापरी, निशा पाटील, प्रीती साबने, कृष्णा राणा, अदिती एकवडे, प्रेमलता केंजळे, तन्वी नाशिकर, अनुराधा डिक्कर, रोहिणी भोसले, तमाली डे, निरुपमा काकडे, संसिया लूद्राज, सुजाता शेलार, सिद्धी सावंत व कल्यानी साजन आदी शिक्षिकांचे मार्गदर्शन मुलांनां लाभलं. पालकांनी देखील त्यांच्या आई विषयी कविता, मनोगते व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले.