पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट ३.५३ टक्के इतका कमी आहे. राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक या शहरांना निर्बंधातून दिलासा देत या शहरातील दुकाने सायंकाळी सातपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडमध्येही निर्बंध शिथिल करीत, दुकाने रात्री ९ पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या की, कोरोना वाढीचा दर ५ टक्केपेक्षा कमी असल्यामुळे पिंपरी चिंचवडला निर्बंधातून सूट मिळणे अपेक्षित होते. मात्र, शहरातील निर्बंध कायम आहेत. दुपारी चारपर्यंतच्या निर्बंधामुळे नागरिकांना खरेदी करता येत नाही. शनिवारी व रविवारीही खरेदी करता येत नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे. दुकानांमध्ये दुपारी ग्राहक येत नसल्याने व्यावसायिकांत असंतोष परसला आहे. ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
दुकाने बंद असल्याने हे व्यावसायिक हवालदिल झाले असून, त्यांना कर्जाची परतफेड व दुकान भाडे भरणे जिकिरीचे झाले आहे. या सर्व बाबींमुळे शहरातील आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिकेची कर वसुली, बांधकाम परवाने, इतर कर व परवाने फी वसुली यावर विपरीत परिणाम झाला आहे. महापालिकेवर कामाचा अतिरिक्त आर्थिक ताण वाढला आहे.
वरील सर्व बाबींचा विचार करून शहरातील सर्व व्यवसाय व दुकाने रात्री ९ पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर ढोरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.



















Join Our Whatsapp Group