पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील दि सेवा विकास को ऑप. बँकेत कर्ज वाटपात ४२९ कोटी ५७ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तत्कालीन चेअरमन, संचालक मंडळ, अधिकारी, कर्जदारांसह ३७ जणांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
बँकेचे तत्कालीन चेअरमन अमर साधुराम मूलचंदानी, संचालक मनोहर साधुराम मूलचंदानी, डॉ. गुरुबक्ष मतनानी, विजयकुमार गोपीचंद रामचंदानी, नरेंद्र पांडुरंग ब्राम्हणकर, पंकज प्रकाश मसंद, धीरज साधू भोजवानी, भारती प्रकाश नंद, दया अशोक मूलचंदानी, दीपा जीवत मंगतानी, राजेश पोपट सावंत, चंद्रशेखर अहिरराव, अशोक साधुराम मूलचंदानी, प्रकाश शिवदास पमनानी यासह बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी. एन. लखानी, ए. एम. बासी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. मुलाणी (मृत), निखिल शर्मा, सहमुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. हिंदुजा, अनिल भागवानी, सीमा सूर्यवंशी, सहायक व्यवस्थापक तथा कर्ज विभागप्रमुख विजय चांदवानी, निलम सोनवाणी, उपव्यवस्थापक तथा कर्ज विभाग प्रमुख विजय चांदवानी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जे. पी. जगवानी तसेच, कर्जदार आरोपी सागर सूर्यवंशी व शीतल सूर्यवंशी (तेजवानी) समूह, विनय आऱ्हाना, विवेक आऱ्हाना, दीप्ती आऱ्हाना, रोझरी ग्लोबल एज्युकेशन, धमेंद्र ब्रिजलाल सोनकर व सोनकर समूह व इतर अशा एकूण ३७ कर्जदार समूह व वैयक्तिक कर्जदारांवर गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी सहनिबंधक, सहकारी संस्था (लेखापरीक्षण) राजेश उद्धवराव जाधवर यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांनी बँकेतील पन्नास लाखांवरील कर्ज प्रकरणाचे लेखापरीक्षण करून ६ ऑगस्टला अहवाल सादर केला आहे. यामध्ये आरोपींनी कर्जदाराची पतपात्रता नसताना, कर्ज परतफेड क्षमता नसताना, विक्रीयोग्य तारण नसताना, तारण मूल्यांकन कमी असताना गैरप्रकाराने नियमबाह्य कर्ज मंजूर केले. मंजूर झालेल्या कर्जातून समूहाची जुनी कर्ज बाकी नियमित केली.
कर्जाची परतफेड केली नाही. कर्जदाराने वितरित कर्ज रकमेचे वक्रवहन व गैरविनियोग केला. असे असताना बँकेने कर्जदाराला विशेष अनुकूलता ठेऊन कर्ज वाटप केल्याचे समोर आले. या प्रकरणात आरोपींनी अर्थ व्यवस्थेतील बेहिशोबी पैसा व्यवहारात आणण्यासाठी व व्यवस्थेबाहेर काढण्यासाठी संगनमत व कट कारस्थान केल्याचे निदर्शनास येत असल्याचे कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group