पिंपरी (Pclive7.com):- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि.०३) राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ताकाका साने यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना आधार दिला. दत्ता साने यांचे गतवर्षी करोनामुळे निधन झाले होते. निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, युवा नेते पार्थ पवार यांनी साने कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते.
चिखली परिसरात वर्चस्व राखून असलेले व भोसरी विधानसभेचे प्रमुख दावेदार म्हणून दत्ताकाका साने यांची गणना होत होती. गतवर्षी करोनामध्ये नागरिकांसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना साने यांना करोनाची लागण झाली होती. चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली होती. राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या दत्ताकाका साने यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. निधनानंतर शरद पवार व पार्थ पवार यांनी साने कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले होते.
आज अजित पवार हे एका सहकारी बॅंकेच्या नव्याने बांधलेल्या इमारतीचे उद्घाटन करण्यासाठी शहरात आले होते. नियोजित दौरा नसतानाही अजित पवार यांनी थेट साने यांचे घर गाठून त्यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यावेळी सुमारे पंधरा मिनिटे ते साने यांच्या घरी थांबले होते.
अवघ्या सहा महिन्यांवर आलेली महापालिका निवडणूक, चिखली परिसरात राष्ट्रवादीमध्ये निर्माण झालेली पोकळी, दत्ताकाका साने यांचे चिरंजीव यश साने यांनी सुरू केलेले सामाजिक कार्य आणि अजित पवार यांनी साने कुटुंबियांची घेतलेली अचानक भेट यामुळे पवार यांनी महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.