पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपला मोठा धक्का लागला आहे. थेरगावमधील भाजपच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
मुंबईत अजित पवार यांच्या उपस्थितीत संतोष बारणे यांनी आज (दि.०९) मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसला आहे.
मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात हा प्रवेश करण्यात आला. शहर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, अभय मांढरे, ऋषिकेश काशिद, राहुल भोईर, सचिन बारणे, योगेश साळुंके यावेळी उपस्थित होते.
संतोष बारणे यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. संतोष बारणे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या पत्नी माया बारणे थेरगावातून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. २०१२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर २०१७ मध्ये भाजपच्या चिन्हावर त्या सलग दुसऱ्यावेळी निवडून आल्या आहेत. थेरगाव परिसरात त्यांचे वर्चस्व आहे. त्यांचे पती संतोष बारणे यांनी आज पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच भाजपच्या पिंपळेगुरव प्रभाग क्रमांक २९ च्या नगरसेविका, महिला व बालकल्याण समिती सभापती चंदा लोखंडे यांचे पती आणि माजी नगरसेवक राजू लोखंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला गळती सुरू झाल्याचे बोलले जाऊ लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चिंचवडवर भर दिल्याचे या दोनही पक्ष प्रवेशावरून दिसून येत आहे.