पिंपरी (Pclive7.com):- फेसबुक आणि इन्स्टाग्राम या सोशल साईडवर रावेतची अस्मिता मलिन करण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत रावेतकरांनी एकत्र येऊन रावेतची बदनामी करणारा व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून असे प्रकार थांबण्याबाबत नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी रावेत पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र राजमाने यांना निवेदन दिले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग अध्यक्ष अक्षय भोंडवे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष प्रभू कांगणे, सामाजिक कार्यकर्ते उमेश भंडारी, संजय भोंडवे आदी उपस्थित होते.
सोशल मीडियावर तयार करण्यात आलेला हा व्हिडीओ पुणे येथील तरुण-तरुणींनी केलेला आहे. यामध्ये तरुण आणि तरुणी एकमेकांशी संवाद साधताना तरुणी तरुणाला विचारते तू कुठला त्यावर तरुण सदाशिव पेठेतला असा उत्तर देतो, तरुणीला तू कुठली असे विचारल्या नंतर ती रावेत येथील सांगते त्यावर तरुण तिच्याकडे तुच्छ नजरेने पाहून रिक्षात बसवून हिला रावेतला सोडा असे सांगत आहे. या वाक्याने रावेतच्या अस्मितेला ठेच पोहचत आहे. रावेत गावची बदनामी या संवादामधून केली जात आहे. याबाबत रावेतकरांनी उठाव करून आपला निषेध व्यक्त केला आहे.
फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर ‘being punekar’ या नावाने व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. रावेत बाबत असाच एक व्हिडिओ पुणे येथील तरुण मुले, मुलींनी बनविला आहे. यामध्ये रावेत गावाबद्दल उपरोधिकपणे उल्लेख या तरुणांनी केला आहे. यामुळे रावेतच्या अस्मितेला ठेच पोहचली आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर केलेल्या या व्हिडिओतील तरुणांवर कायदेशीर कारवाई करावी व असे प्रकार थांबले पाहिजे यासाठी ग्रामस्थांच्या वतीने नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले.
रावेत हे पुणे शहराचे प्रवेशद्वार आहे. रावेत उपनगर सर्व सोयी सुविधा युक्त आणि प्रशस्त तसेच विकसनशील उपनगर असल्याने अनेक नागरिकांची येथे वास्तव्यास पसंदी आहे. त्यामुळे सुसंस्कृत आणि धार्मिक अशी ओळख असणाऱ्या रावेत गावचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने बदनामी झाली. सदर व्हिडीओ मध्ये करण्यात आलेल्या संवादातून आमच्या रावेत गावाला कमी लेखण्यात आले आहे. याबाबत आम्ही निषेध नोंदवून सदर व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन दिले आहे.
– मोरेश्वर भोंडवे नगरसेवक, पिं.चिं.मनपा