पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे परवाना निरीक्षक, कार्यालयीन अधिक्षक आणि काही सेवानिवृत्त अधिका-यांच्या आर्शिवादाने अनधिकृत होर्डिंग्ज धंदा खुलेआम सुरु होता. आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2018-2019 मध्ये पालिका जागेवर होर्डिंग्ज उभारण्याची निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यानूसार 323 जागेपैकी केवळ 66 जागेवर ठेकेदारांना होर्डिग्ज उभारण्यास वर्क ऑर्डर दिली. मात्र, पालिकेशी करारनामा, वर्क ऑर्डर न घेता 257 जागेवर ठेकेदारांनी अनधिकृतपणे होर्डिग्ज उभारली असल्याचे दिसून आले.
यामुळे मागील दोन वर्षापासून ठेकेदारांनी परवाना निरीक्षक, तत्कालिन अधिका-यांना हाताशी धरुन विभागाच्या कोट्यावधी रुपयाच्या उत्पन्नावर डल्ला मारला आहे. त्यामुळे परवाना निरीक्षक, सेवानिवृत्त कार्यालयीन अधिक्षक, वरिष्ठ अधिका-यांवर आयुक्त राजेश पाटील हे कोणती कारवाई करणार हे पहावे लागेल.
पिंपरी-चिंचवड शहरात सर्वच पक्षातील राजकीय नेते, संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचा-यांच्या आशिर्वादाने अनधिकृत होर्डिंग्जचा धंदा जोरदार सुरू आहे. महापालिका हद्दीत आकाशचिन्ह व परवाना विभागाने होर्डिंग्जचे 2 हजार 13 परवाने अधिकृतरित्या वितरित केले आहेत. संबंधित विभागाने सन 2018-2019 मध्ये निविदा राबवून 323 जागेवर सात वर्षांसाठी होर्डिग्ज उभारण्याची परवानी देण्यात आली.
मात्र, महापालिकेच्या 66 जागेवर होर्डिंग्ज उभारण्याचे आदेश ठेकेदारांना देण्यात आले. त्यापैकी अजूनही 257 जागेवर होर्डिंग्ज उभारण्याची परवानगी दिलेली नाही. तरीही एका रात्रीत अनेक ठिकाणी होर्डिंग्ज उभारली. यातील २५७ ठिकाणी अनधिकृतपणे उभारण्याचे दिसून आले.
केवळ 35 होर्डिंग्जवर कारवाईचा फार्स….
आयुक्त राजेश पाटील यांच्या आदेशाने आकाशचिन्ह व परवाना विभागाने अनधिकृत होर्डिग्जवर धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या जागेवर आकाशचिन्ह व परवाना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात 109 जागेवर 118 अनधिकृत होर्डिंग्ज आढळून आले. त्यापैकी 35 हून अधिक होर्डिंग्जवर धडक कारवाई केली. तर 25 होर्डिंग्ज स्वत:हून मालकांनी काढून घेतले आहेत. तर संपुर्ण शहरातील पथदिव्यांवर लावलेले किऑक्स अनधिकृत असून आतापर्यंत 17 हजार 207 किऑक्स काढण्यात आले आहेत. अशी माहिती सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिली.
परवाना निरीक्षक की ठेकेदार, दोषी कोण?
आकाशचिन्ह व परवाना विभागाने सन 2018-2019 मध्ये निविदा राबवून 323 जागेवर सात वर्षांसाठी होर्डिग्ज उभारण्याची निविदा राबविली. त्यातील केवळ 66 ठेकेदार संस्था होर्डिंग्ज उभारण्याचे वर्क ऑर्डर दिली. परंतू उर्वरीत 257 जागांवर संबंधित ठेकेदारांनी परवानगी नसताना होर्डिंग्ज उभारली आहेत. त्यामुळे पालिकेचे आदेश नसताना होर्डिंग्ज उभारणे हे अनधिकृत असल्याचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांनी सांगितले. दरम्यान, संबंधित ठेकेदारांनी वर्क ऑर्कर नसताना शहरात अनधिकृत होर्डिंग्ज उभारली आहेत. हे त्या-त्या परवाना निरीक्षकांना व ठेकेदारांना माहित होते. तरीही त्यावर पालिकेच्या अधिकारी व कर्मचा-यांनी कुठलीही कारवाई केली नाही. मग यात दोषी कोण हे आयुक्तांना शोधावे लागणार आहे.