पिंपरी (Pclive7.com):- ‘ठेकेदारी हटवा, महापालिका वाचवा, ठेकेदारीचा भ्रष्टाचार थांबलाच पाहिजे, ठेकेदारी हटाव, कोरोना योद्धे बचाव’ असे फलक हातामध्ये घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मानधनावरील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील खासगीकरणाविरोधात मंगळवारी (दि.२८) आंदोलन केले.
कोविड योद्धा बचाव कृती समितीने याविरोधात महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. कोविड योद्धाना न्याय मिळावा, मानधन तत्त्वावर कायम ठेवावे, समान काम समान वेतन द्यावे, आम्हाला ठेकेदारीमध्ये टाकू नका, ११ महिने करार पद्धतीने कामावर ठेवा, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व सुविधा मिळाव्यात अशा मागण्या मानधनावरील कर्मचाऱ्यांनी केल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध रुग्णालयांत खासगी एजन्सीमार्फत मनुष्यबळ पुरविण्यास सत्ताधारी भाजपने मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयासह इतर नऊ रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून स्टाफ नर्स पॅरामेडीकल स्टाफसह इतर कर्मचाऱ्यांची आऊटसोसिंगद्वारे नेमणूक केली जाणार आहे.
या रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासाठी तीन ठेकेदारांची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या खासगीकरणाला मानधनावरील कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध केला. या आंदोलनकर्त्यांची मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.





















Join Our Whatsapp Group