पिंपरी (Pclive7.com):- स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात बुडत असलेल्या दोघांचे जीव वाचवणाऱ्या बालवीराचा पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मंगळवारी (दि.२८) सायंकाळी पोलिस आयुक्त कार्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
आयुष गणेश तापकीर (वय १३, रा. गुळवेवस्ती, भोसरी) असे गौरव करण्यात आलेल्या बालवीराचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोमवारी (दि. २७) सकाळी सूरज अजय वर्मा (वय १२), ओमकार प्रकाश शेवाळे (वय १३), संदीप भावना डवरी (वय १२), ऋतुराज प्रकाश शेवाळे (वय १४) असे चौघेजण भोसरीतील सद्गुरूनगर येतील तलावात पोहण्यासाठी गेले होते.
पोहताना पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही पाण्यात बुडू लागली. त्यावेळी त्या ठिकाणी म्हैस चरण्यासाठी आलेल्या आयुषने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारून संदीप आणि ऋतुराज यांना बाहेर काढले. मात्र, तोपर्यंत सूरज आणि ओमकार या दोघांचा तो वाचवू शकला नाही.
आयुषच्या या धाडसीपणाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक झाले. माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आयुषने ‘त्या वेळी मनाला जे योग्य वाटले तेच आपण केल्याचे सांगितले’. तसेच, त्या ठिकाणी आणखी काहीजण असूनही त्यांनी बघ्यांची भूमिका घेत मदत न केल्याची खंत व्यक्त केली. भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भास्कर जाधव यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. त्यांनादेखील आयुषच्या कामगिरीचे मोठे कौतुक वाटले. त्यांनी याबाबत पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना माहिती दिली. त्यानंतर लगेचच कृष्ण प्रकाश यांनी आयुषला बोलावून त्याची पाठ थोपटली.
आयपीएस अधिकारी होण्यासाठी दिल्या शुभेच्छा
आयुषने अडचणी काळात मदत केल्याने दोन जीव वाचले आहेत. त्याने दाखवलेल्या या धाडसाची खरंच दाद द्यावी लागेल. अशा शब्दात पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आयुषच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले की, आयुषसारख्या मुलांची पोलिस दलामध्ये गरज आहे. त्याने चांगला अभ्यास करून आयपीएस अधिकारी व्हावे.






















Join Our Whatsapp Group