पिंपरी (Pclive7.com):- दापोडी येथे आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा समिती सह फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नेते, कार्यकर्ते व समविचारी पक्ष-संघटना तर्फे रविवारी दुपारी दापोडी येथील हॅरिस ब्रीज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत महामोर्चा काढण्यात आला.

यावेळी प्रमुख वक्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग स्कुल फॉर एंट्रान्स टू पॉलिटिक्स बीड संस्थेचे संचालक सिद्धार्थ शिनगारे उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्दकरावी. सदर समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करण्यात यावा. समितीने गोळा केलेली माहिती अनुभवजन्य, वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ नसल्याने ती सामाजिक न्यायाच्या निकषांवर ग्राह्य धरू नये तसेच अनुसूचित जातींतील कोणत्या उपजातींना आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही, याचा स्वतंत्र आणि सर्वसमावेशक अभ्यास झाल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये. उपवर्गीकरणापूर्वी अनुसूचित जातीतील सर्व समाजघटक, सामाजिक संघटना, लोकप्रतिनिधी व तज्ज्ञ यांच्याशी व्यापक चर्चा करण्यात यावी.

संविधानाने दिलेल्या आरक्षणाची पूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समता, बंधुता आणि सामाजिक ऐक्याचा विचार दिला. त्या विचारांचा वारसा जपण्यासाठी महाराष्ट्रात सामाजिक सलोखा अबाधित राहणे आवश्यक आहे त्यामुळे अनुसूचित जार्तीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करून सामाजिक न्यायाच्या घटनात्मक तत्त्वांचे संरक्षण करावे या मागण्यासाठी महामोर्चा काढण्यात आलेले होते.

समितीच्या सर्व मागण्या जर लवकर पूर्ण नाही झाल्यास संपूर्ण महाराष्ट्र व्यापी संघर्ष महामोर्चा काढण्यात येणार असल्याचे प्रतिपदात महामोर्चा समिती यांनी यावेळी घोषणा केली आहे. यावेळी पुण्यासह महाराष्ट्रातील दलीत चळवळीचे अनेक नेते, कार्यकर्ता सह मोठ्या प्रमाणात नागरिक महामोर्चाला उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group