पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील गजबजलेल्या बाजारपेठेत भरदिवसा घडलेल्या धाडसी दरोड्याच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. चॉईस व्हरायटी या दुकानात तीन अज्ञात तरुणांनी घुसून धारदार शस्त्राचा धाक दाखवत गल्ल्यातील सुमारे ७० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुण अचानक दुकानात आले. त्यांनी दुकानदार आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या ग्राहकाला शस्त्राचा धाक दाखवत बाहेर जाण्यास भाग पाडले. त्यानंतर आरोपींनी गल्ल्यातील रोकड क्षणार्धात घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

दरोड्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. फुटेजमध्ये आरोपींच्या हालचाली स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भरदिवसा बाजारपेठेत घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध सुरू असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




















Join Our Whatsapp Group