
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या क्रीडा गुणवत्तेला योग्य दिशा मिळावी आणि त्यांना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘क्रीडा प्रबोधिनी (स्पोर्ट्स अकॅडमी)’ उभारण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविका रिटा सचिन सानप यांनी महापालिका सर्वसाधारण सभेत केली.

क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीच्या विषयावर बोलताना सानप यांनी ‘खेळाडू घडवा आणि पट वाढवा’ ही अभिनव संकल्पना महापालिका शाळांमध्ये राबविण्याची आवश्यकता व्यक्त केली. महापालिका आयुक्तांनी यशस्वीपणे राबविलेल्या ‘गुढी पाडवा, पट वाढवा’ या उपक्रमाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी विशेष योजना सुरू करण्यात यावी, असे त्यांनी सुचविले.

महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्ट क्रीडा कौशल्य असूनही प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि सुविधांच्या अभावामुळे त्यांना मोठ्या स्पर्धांपर्यंत पोहोचता येत नाही. विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात क्रीडा प्रबोधिनी उभारणे आवश्यक असल्याचे सानप यांनी सांगितले.

तसेच, पोलीस भरतीसह विविध शासकीय सेवांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी धावपट्टी, गोळाफेक व इतर मैदानी क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र सुविधा निर्माण करण्यात याव्यात. यासाठी आवश्यक क्रीडा साहित्य मोफत उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली.

या उपक्रमामुळे महापालिका शाळांमधील गुणवंत खेळाडू विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करता येईल. क्रीडा कोट्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक व रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल. तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास विकसित होऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास रिटा सानप यांनी व्यक्त केला.




















Join Our Whatsapp Group