पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र काँक्रिट रस्ते, ड्रेनेजची कामे सुरू आहेत. ती कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करावीत. अन्यथा संबंधित कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे आदेश महापौर उषा ढोरे यांनी बुधवारी (दि.२९) महापालिकेच्या आयुक्तांना दिले.
स्थापत्य व आरोग्यविषयक कामांचा आढावा घेण्यासाठी आयुक्त दालनात बुधवारी आढावा बैठक झाली. त्यात त्यांनी वरील सूचना केल्या. यावेळी उपमहापौर हिराबाई घुले, स्थायी समिती अध्यक्ष अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, क्षेत्रीय अधिकारी, कार्यकारी अभियंता, सहायक आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
महापौर ढोरे म्हणाल्या की, शहरातील विविध भागांत सिमेंटच्या रस्त्याचे कामे सुरू आहेत. पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या बाजूला स्ट्रॉम वॉटर लाईनवर असणारे चेंबर हे समतल नाहीत. त्यामुळे पावसाच्या पाणी साचून चिखल होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ता दुरुस्तीची कामे व्यवस्थित केली जात नसल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे.
पावसाचे पाणी जाण्यासाठी खोदलेले चेंबरची कामे लवकरात लवकर पूर्ण करावेत. ती कामे दिवाळीपूर्वी पूर्ण करावीत. काही भागांत मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आहे. तेथील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा सूचना त्यांनी दिल्या.
स्वच्छतेला प्राधान्य – आयुक्त
पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य दिले जाणार आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी दररोज प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून स्वच्छता व स्थापत्यविषयक कामे प्राधान्याने पूर्ण करावीत. साफसफाईच्या कामकाजाचे परीक्षण करण्यासाठी त्याचा नियोजन आराखडा तयार करावा. आठ क्षेत्रीय कार्यालयासाठी ८ तपासणी पथक तयार करून साफसफाई कामाबाबत तपासणी केली जाणार आहे, असे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करा – नामदेव ढाके
शहरातील मोकळ्या जागेवर कचरा टाकला जातो. अशा नागरिकांवर कारवाई केली जावी. डीपी बॉक्सजवळील व रस्ता दुभाजकाजवळील वाढलेले गवत, कचरा लवकर काढला जात नाही. महावितरण विभागाशी समन्वय साधून कामे करून घ्यावीत. रस्त्याची कामे करताना व डांबरीकरण करताना चेंबरची पातळी समान करून घ्यावी. अनधिकृत फ्लेक्स, झाडांवर, डीपी बॉक्सवर अनधिकृत जाहिराती लावल्या जातात त्यावरही कारवाई करण्यात यावी, अशा सूचना पक्षनेते नामदेव ढाके यांनी केल्या.






















Join Our Whatsapp Group