पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील आणखी एका पोलीस ठाण्याला राज्याच्या गृह विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. चाकण पोलीस ठाण्याचे विभाजन करून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याला मान्यता देण्यात आली. याबाबत शुक्रवारी उशिरा अध्यादेश काढण्यात आला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत नवीन पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. त्यातील रावेत पोलीस ठाण्याला यापूर्वीच मान्यता दिली. त्यापाठोपाठ महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यालाही मान्यता मिळाली. राज्याच्या वित्त विभागाने खर्चाला मान्यता दिली. त्यानंतर राज्याच्या गृहविभागाकडून देखील याबाबत मान्यता दिली.
आयुक्तालयाकडील मंजूर संख्याबळातून महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी पदे मंजूर केली आहेत. एक पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक, पाच उपनिरीक्षक, तीन सहायक उपनिरीक्षक, १० हवालदार, १३ पोलीस नाईक, ३२ पोलीस शिपाई, अशी एकूण ६७ पदे उपलब्ध करून देण्यात मान्यता दिली.
तसेच या पोलीस ठाण्यासाठी आणखी आवश्यक असलेली पोलीस निरीक्षक एक, सहायक पोलीस निरीक्षक दोन, सहायक पोलीस उपनिरीक्षक १२, पोलीस हवालदार २०, पोलीस नाईक २२, पोलीस शिपाई ३८, सफाई कामगार दोन, अशी एकूण ९७ पदे २८ मे २०१८ रोजीच्या निर्णयान्वये आयुक्तालयासाठी तीन टप्प्यांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या मनुष्यबळातून पुरविण्यास मान्यता दिली.
नवनिर्मित महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यासाठी येणारा २७ लाख ९५ हजार ४०० रुपयांचा उर्वरित खर्च आयुक्तालयाच्या उपलब्ध मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा, असे सूचित केले आहे.





















Join Our Whatsapp Group