पिंपरी (Pclive7.com):- लसीकरण शंभर टक्के झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येणार नाही, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील लसीकरणाने वेग घेतला आहे. शहरातील २० टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला नाही. राज्य सरकारच्या मिशन कवच कुंडल मोहिमेला प्रतिसाद द्यावा. कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण पूर्ण होण्यासाठी महापालिकेने आजपासून घरोघरी जाऊन लसीकरण सुरू केले आहे.
कोरोनाची साथ कमी झाली. त्याचे कारण केवळ लसीकरण आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. शहरातील वीस टक्के नागरिकांनी पहिलाही डोस घेतला नाही. या नागरिकांनी त्वरित पहिला डोस घ्यावा. ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांनी दुसराही डोस घ्यावा. कोविड लसीच्या उपलब्धतेची परिस्थिती आता बदलली आहे. पूर्वीसारखा लसींचा तुटवडा नसल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रयत्न
औद्योगिकनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. आजपर्यंत २० लाख ५० हजार जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. वीस टक्के नागरिकांचा पहिला डोस राहिला आहे. कोरोनाची दुसरी लाट कमी झाली असली तरी महापालिका प्रशासनाने तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरणावर भर दिला आहे.
लस घेण्यासाठी नागरिकांची उदासीनता
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बैठक घेऊन अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी नागरिक पुढे येत नाहीत. लसीची उलब्धता मुबलक प्रमाणात आहे. पण, नागरिक लसीकरणाला येताना दिसत नाहीत. मागील चार ते पाच दिवसांपासून दिवसभरात केवळ ८ हजार नागरिकांचे लसीकरण होत आहे.
महापालिकेस आणखी डोस मिळणार आहेत. ‘कवच कुंडल’ या राज्य सरकारच्या मिशन मोहिमेला प्रतिसाद द्यावा, नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी लस घ्यावी. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी






















Join Our Whatsapp Group