पिंपरी (Pclive7.com):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत स्वप्निल कांबळे विजयी हे विजयी झाले आहेत.
रिपाईच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदाकरिता यंदा प्रथमच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली होती. त्याकरिता कुणाल वाव्हळकर आणि स्वप्निल कांबळे या दोन उमेदवारांचे अर्ज छानणी प्रक्रियेत वैध ठरले. तसेच अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने अर्ज माघारी न घेतल्याने ही निवडणूक दुरंगी होणार असल्याचे स्पष्ट झाले होते.
रविवार (दि.१०) ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये एकुण मतदान १४५३ झाले. ७९ च्या मताधिक्याने स्वप्निल कांबळे हे आरपीआय पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
रिपाइंच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या निर्देशानुसार पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. त्याकरिता जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली होती. ५० सदस्यांची समिती देखील स्थापन करण्यात आली होती.
शहराध्यक्ष पदाकरिता निवडणूकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रभारी सूर्यकांत वाघमारे, चंद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब भागवत आणि शहरातील बहुतांश आरपीआय कार्यकर्ते उपस्थित होते.