पिंपरी (Pclive7.com):- तब्बल एक वर्षानंतर पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी कैलास कदम यांची निवड झाली. त्यानंतर काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू झाली आहे. नवीन अध्यक्षाविरोधात आजी माजी नगरसेवकांनी बैठक घेत कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली.
राज्य आणि केंद्राच्या नेतृत्वाने पिंपरी-चिंचवड शहरावर अन्याय केल्याने शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी ११ नोव्हेंबर २०१० रोजी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतरही ११ महिने त्यांच्याकडेच जबाबदारी दिली होती. साठे यांची राज्य कार्यकारिणीत सचिवपदी वर्णी लागली. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी शहराध्यक्षपदी कैलास कदम यांची निवड जाहीर केली.
बैठकीत राज्य सचिव सचिन साठे यांच्याकडे सर्वांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीस माजी महापौर कविचंद भाट, प्रदेशच्या माजी उपाध्यक्ष निगार बारस्कर, महिला अध्यक्षा गिरीजादेवी कुदळे, माजी शिक्षण मंडळ सभापती विष्णूपंत नेवाळे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, राजू गोलांडे, युवकचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर जैसवाल, किशोर कळसकर, शहाबुद्दीन शेख, ज्येष्ठ नागरिक सेलचे लक्ष्मण रूपनर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सुरू झालेल्या या गटबाजीचा मोठा फटका काँग्रेसला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता तरी पक्षश्रेष्ठींनी शहरात लक्ष घालून हा वाद मिटवावा अशी मागणी सर्वसामान्य कार्यकर्ते करीत आहेत.