पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालय, पुणे नेत्र सेवा प्रतिष्ठान, लायन्स क्लब ऑफ़ पुणे शताब्दी यांच्या संयुक्त विद्यमाने १७४ वे मोफत तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ पुणे शताब्दीचे अध्यक्ष दीपक कुदळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी पिंपरी येथील डॉ.डी वाय पाटील आयुर्वेद रुग्णालयामध्ये हे शिबीर संपन्न होणार आहे. मात्र या शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची तपासणी २२ नोव्हेंबर रोजी होईल. २६ रोजी अंतिम तपासणी होईल.
या शिबिराच्या उदघाटनास डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी डी पाटील, प्रो चान्सलर डॉ.भाग्यश्री पाटील व लायन्स क्लबचे प्रांतपाल हेमंत नाईक, आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे माजी संचालक लायन नरेंद्र भंडारी, नेत्र सेवा प्रतिष्ठानचे डॉ. सतीश देसाई, डॉ. विनोद शाह, शताब्दी क्लबचे अध्यक्ष दीपक कुदळे, आदी उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरात नेत्र सेवा प्रतिष्ठानचे मुख्य नेत्रतज्ञ डॉ. मधुसूदन झंवर, डॉ.राजेश पवार, डॉ.रमेश भांगे, डॉ.ललित शाह, व नेत्र सेवा व डी. वाय पाटील रुग्णालयाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहेत.या डॉक्टर शस्त्रक्रिया करणार आहे.
डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालयाचे प्राचार्य डॉ. गुणवंत येवला रुग्णालयाच्या सुविधांची माहिती देताना सांगितले की, “डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालय हे 325 बेड चे NABH व ISO मानांकन प्राप्त रुग्णालय आहे. 5 ऑपरेशन थिएटर, सर्वोत्तम पंचकर्म विभाग, सुधातत्व आयुर्वेद फार्मसी या सुविधांनी सज्ज असे रुग्णालय अनेक सामाजिक उपक्रमांना साथ देत असते.
रुग्णालयात स्वाभाविक प्रसूती, मूळव्याध शस्त्रकर्म, मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. तसेच रुग्णालयात सर्व सोयी सुविधांनी युक्त असा पॅरलिसिस विभाग रुग्णांच्या सेवेत उपलब्ध आहे. रुग्णालयात राहणे व जेवण सुविधा मोफत आहेत. तसेच इतर चिकित्सा व तपासण्या अल्प दरात उपलब्ध आहेत. दिनांक २७/२८ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या तिरळेपणा शस्त्रक्रिया शिबिरास भरगोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले.”
या पत्रकार परिषदेस नेत्र सेवा प्रतिष्ठानचे मुख्य डॉ. मधुसूदन झंवर, लायन्स क्लब शताब्दीचे अध्यक्ष दीपक कुदळे,कैलाश मलिक, फ्रेडी गोदरेज डॉ.डी.वाय.पाटील आयुर्वेद रुग्णालय तर्फे प्रिन्सिपल डॉ. गुणवंत येवला, उपप्राचार्य डॉ. प्रशांत खाडे उपस्थित होते.