हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडे मागणी; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक समस्येबाबत लक्ष वेधले
पिंपरी (Pclive7.com):- पुणे, पिंपरी-चिंचवड रेसिडेन्सिअल कॉरीडोर ते पुणे इंडस्ट्रीअल कॉरीडोर वाहतूक व्यवस्थेच्या नियोजन तसेच आराखडा तयार करणे कामी व अंमलबजावणीसाठी पूर्णवेळ उच्चपदस्थ सनदी अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
मुंबई येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार लांडगे यांनी प्रधान सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाकडे निवेदन दिले आहे. अल्पावधीचे अधिवेशन असल्यामुळे याबाबत थेट चर्चा करावी, अशी मागणीही केली आहे.
आमदार लांडगे यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराचा विकासाचा वेग झपाट्याने वाढत आहे. तसेच, खेड, चाकण आणि रांजणगाव एमआयडीसी औद्योगिक पट्टयात मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झाले आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातून ‘इंडस्ट्रिअल कॉरिडॉर’मध्ये जाणारा एकमेव मुख्य रस्ता पुणे-नाशिक महामार्ग आहे. चाकण, रांजणगाव या औद्योगिक पट्ट्यामुळे या ठिकाणी जाण्याकरिता पुणे नाशिक महार्गावर प्रचंड वाहतूक असते. पुणे व पिंपरी चिंचवड मधील लाखो नागरिक चाकण औद्योगिक वसाहत मध्ये कामास जा-ये करीत असतात. सकाळच्या व सायंकाळच्या वेळेस चाकण ते नाशिक फाटा दरम्यान वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणत होऊन तासन तास नागरिकांचा वेळ खर्ची पडतो.
यापार्श्वभूमीवर नाशिक फाटा ते खेड या राष्ट्रीय महामार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याबाबत तसेच भविष्यातील २५ वर्षांचा विचार करुन पुणे-नाशिक महार्गावर येणारा ताण लक्षात घेता मनपा हद्दीतून औद्योगिक पट्ट्याकडे अस्तित्वात असणारे मार्ग रुंदीकरण करून तसेच नवीन रस्त्याचे जाळे तयार करून नवीन मार्ग निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
तळेगाव, शिक्रापूर, नाशिक फाटा ते खेड आणि पुणे ते रांजणगाव निवासी क्षेत्रातून औद्योगिक क्षेत्रात प्रवेश करणारे महत्त्वाचे रस्ते आहेत. शासनाच्या विविध विभागामार्फत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पी.एम.आर.डी.ए, सावर्जनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, एमआयडीसी आदी आस्थापनांच्या हद्दीत आहेत. त्यामुळे संबंधित सर्व आस्थापनांशी समन्वय साधण्यासाठी सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती करणे हिताचे ठरणार आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाची गती पहाता वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्याचे जाळे निर्माण करणे, हा एकमेव उपाय आहे. तसेच, रेशिडेन्सिअल कॉरिडॉरमधून इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमध्ये जाण्यासाठी पर्यांयी वाहतूक व्यवस्थेचा आराखडा तयार करता यावा. यासाठी एक उच्चपदस्थ सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यावा जेणे करून अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. निवासी आणि औद्योगिक क्षेत्रातील रस्त्यांचा अभ्यास करुन पर्यायी रस्त्यांचे जाळे निर्माण करण्याबाबत आराखडा तयार करणे आणि संबंधित अस्थापनांशी समन्वय ठेवून रस्त्यांची कामे नियोजित वेळत पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी द्यावी. भविष्यात वाहतूक कोंडी मुक्त पुणे आणि पिंपरी-चिंचवड औद्योगिक क्षेत्र करण्यासाठी या मागणीचा सकारात्मक विचार करावा, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.






















Join Our Whatsapp Group