पिंपरी (Pclive7.com):- ‘उद्योगनगरी’ अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडवर सत्ता गाजवण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे ‘युवराज’ म्हणून परिचित असलेल्या युवा योद्धांनी मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपाला आव्हान देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून वाढीस रसद मिळत असल्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील घडामोडींवर दोन्ही युवराजांचे बारिक लक्ष आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक मार्च किंवा एप्रिल २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ‘युवराज’ अर्थात युवा नेते पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणुकीपासूनच शहराच्या राजकारणात लक्ष घातले आहे. पार्थ हे राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र आहेत.
पिंपरी-चिंचवडकरांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना साथ दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्त्व सुमारे १५ वर्षे स्वीकारले. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी मावळमधून उमेदवारी घेतली. परंतु, या निवडणुकीत पिंपरी-चिंचवडकरांनी पवार कुटुंबियांच्या घराणेशाहीला नाकारले. पार्थ यांचा सुमारे अडीच लाख मतांनी पराभव झाला.
आता शिवसेनेचे ‘युवराज’ अर्थात राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश शिवसैनिकांना यापूर्वीच दिले आहेत. शिवसेनेचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदित्य सुपूत्र आहेत.
मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार स्थानिक प्रश्नांना सोशल मीडियाद्वारे फुंकर घालताना दिसतात. तसेच, महापालिका भवनात थेट भेट देवून आयुक्तांशी विविध मुद्यांवर चर्चा करतानाही पार्थ पाहायला मिळतात. आता आदित्य ठाकरे हेसुद्धा दोन दिवस पुणे- पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर येणार आहेत.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराचे राजकारण महापालिकेच्या कारभारावर चालते. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर शिवसेनेला या दोन्ही शहरांमध्ये वर्चस्व निर्माण करायचे आहे. तसेच, ठाकरे आणि पवार कुटुंबातील पुढची पिढी महापालिकेच्या राजकारणात सक्रीय करुन पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे राजकारणाचा केंद्रबिंदू ठाकरे-पवार कुटुंबातील नव्या पिढी ठेवण्याची मानसिकता दोन्ही पक्षांची आहे. अशीच काही परिस्थिती नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी मोठ्या महापालिका किंबहूना स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आहे. मोठ्या महापालिकांची सूत्रे ठाकरे-पवार कुटुंबियांतील नव्या पिढीच्या हातात राहिल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होईल, असा कयास आहे.
पिंपरी-चिंचवडकर नवे नेतृत्त्व स्वीकारणार काय?
आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचा विस्तार पुणे-पिंपरी-चिंचवडमध्ये जोमाने करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. तसेच, मावळ लोकसभा मतदार संघातील पिंपरी आणि चिंचवडमध्ये आतापासून मोर्चबांधणी करण्याची निर्धार पार्थ पवार यांनी कायम ठेवला आहे. या दोन्ही नेत्यांच्या निमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीची नवी पिढी राजकारणात निर्णायक भूमिकेत येताना दिसत आहे. मात्र, आगामी काळात पिंपरी-चिंचवडकर नागरिक ठाकरे-पवार कुटुंबातील नवोदित नेत्यांचे नेतृत्व स्वीकारणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.