मुंबई (Pclive7.com):- भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदी यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला आणि लतादीदी या अनंतात विलीन झाल्या. लतादीदी यांना निरोप देण्यासाठी अलोट गर्दी शिवाजी पार्क परिसरात पाहायला मिळाली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुष्पचक्र अर्पण करत लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मंगेशकर कुटुंबियांना धीर देत त्यांचे सांत्वन केले.
त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, सचिन तेंडुलकर, श्रद्धा कपूर, शाहरुख खान, आमिर खान या सिनेसृष्टीतील दिग्गजांसह, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी पुष्पचक्र अर्पण करत लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.
लता मंगेशकर यांना ८ जानेवारीला करोनाची लागण झाली होती. त्यांना करोनाची सौम्यं लक्षणं जाणवत होती. त्यांना न्यूमोनियाचीही लागण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं.
प्रकृतीत सुधारणा होऊ लागल्यानंतर २८ जानेवारीला त्यांना व्हेंटिलेटरवरुन काढण्यात आलं होतं. मात्र ५ फेब्रुवारीला प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. पण उपचादारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.





















Join Our Whatsapp Group