नगरसेविका ममता विनायक गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी (Pclive7.com):- बीआरटी विभागामार्फत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या वाकड येथील ४५ मीटर दत्त मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे सादरीकरण नागरिकांसमोर करण्याची मागणी नगरसेविका ममता गायकवाड आणि माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली.

यासंदर्भात बोलताना नगरसेविका गायकवाड म्हणाल्या की, सदर कामाची वर्क ऑर्डर ठेकेदारास देण्यात आलेली आहे. सदरील कामाचे भूमिपूजन करण्याचा घाट काही राजकीय मंडळी प्रशासनामार्फत घालत आहेत. भरमसाठ अतिक्रमणामुळे जेवढ्या जागा ताब्यात आहेत, त्यानुसार रस्ता विकसित करावा असा प्रशासनाचा व आयुक्तांचा हेतू दिसतो आणि नागरिकांना ४५ मीटर रुंद रस्त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रशासनाचा व काही लोकप्रतिनिधींचा प्रयत्न दिसत आहे.
सदरील रस्ता वाकडकरांसाठी महत्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता कशा पद्धतीने विकसित होणार आहे, यामध्ये कोणकोणत्या सुविधा असणार आहेत व मुख्यत्वे याची रुंदी किती असणार आहे याबाबत नागरिकांना व लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला या प्रकल्पाचे अद्यापपर्यंत सादरीकरण झालेले नाही.
सदरील रस्त्याच्या प्रकल्पाचे सादरीकरण नागरिकांना होणे महत्वाचे आहे, त्याअनुषंगाने प्रशासनाकडून तात्काळ प्रभाग क्र २५ व २६ प्रभाग मध्ये बीआरटी विभागामार्फत नव्याने विकसित करण्यात येणाऱ्या ४५ मीटर दत्त मंदिर रस्त्याचे काँक्रीटीकरण प्रकल्पाचे सादरीकरण देण्यात यावे. सादरीकरण झाले नाही तर प्रशासनास वाकडवासियांच्या रोषास व विरोधास सामोरे जावे लागेल, असा इशारा नगरसेविका गायकवाड यांनी दिला आहे.

























Join Our Whatsapp Group