पिंपरी (Pclive7.com):- गुढीपाडव्या निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दि.०२ एप्रिल रोजी ‘शिवतिर्थ’ मुंबई येथे भव्य मेळावा संपन्न होणार आहे. हिंदुजननायक राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी पिंपरी चिंचवड शहर मनसेचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने ‘शिवतीर्थ’ या ठिकाणी जाणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली आहे.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/03/IMG-20220324-WA0025-300x300.jpg)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना – पिंपरी चिंचवड शहर सर्व अंगिकृत संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महाराष्ट्र सैनिक यांची बुधवार दि.३० रोजी महत्वाची बैठक आयोजित केली होती. पिंपरी विधानसभेची बैठक मनसे मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय येथे, चिंचवड विधानसभेची बैठक हेमंत डांगे यांचे जनसंपर्क कार्यालय, चिंचवड येथे तसेच भोसरी विधानसभेची बैठक विशाल मानकरी यांचे निवासस्थान, रामेश्वर चौक, रुपीनगर या ठिकाणी संपन्न झाली. पिंपरी चिंचवड शहर प्रभारी गणेश सातपुते, किशोर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली.
गुढीपाडवा मेळाव्यानिमित्त अतिशय जल्लोषात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व महाराष्ट्र सैनिक तसेच ज्या नागरिकांना राजसाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी यायचे आहे, अशा नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पिंपरी चिंचवड शहर मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय या ठिकाणाहून बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शनिवार दि.०२ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता सर्व बसेस मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जेवणाची व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व नागरिकांनी व महाराष्ट्र सैनिकांनी हिंदूजननायक राज साहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केले आहे.