पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक राजेश पाटील यांनी शासकीय रुग्णालयाच्या धर्तीवर मनपाच्या सर्व रुग्णालयात वैद्यकीय उपचार व सुविधा करीता केलेली वाढीव दरवाढ तातडीने मागे घ्यावी. तसेच महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा सुरु होऊन महिना उलटून गेला तरी शालेय साहित्य वाटप करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरले आहे. विद्यार्थ्यांना विनाविलंब शालेय साहित्य वाटप करण्याविषयी महानगरपालिका प्रशासक यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रवेशद्वार, पिंपरी याठिकाणी नागरी समस्या निवारण समिती व शहरातील समविचारी राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांच्यावतीने प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करून आंदोलन करण्यात आले.

आंदोलना दरम्यान बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले की, प्रशासक राजेश पाटील यांनी केलेली रुग्णालयातील दरवाढ मागे घ्यावी व रखडलेले शालेय साहित्य तातडीने वाटप करावे. तर स्वराज्य इंडियाचे मानव कांबळे यांनी येत्या १ ऑगस्ट पासून रुग्णालयीन दरवाढ लागू केली तर दि.२ ऑगस्ट रोजी मनपाच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय संत तुकाराम नगर याठिकाणी आंदोलन करण्याचा इशारा दिला.
आंदोलनात बोलताना काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी आयुक्तांनी केलेल्या दरवादीचा फेरविचार करावा अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल असे मत व्यक्त केले. तर माजी नगरसेवक व समिती समन्वयक मारुती भापकर यांनी प्रशासक यांनी लोकनियुक्त सभागृह नसताना अशाप्रकारचा अन्यायकारक निर्णय जनतेवर लादू नये अशी भूमिका मांडली. हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भापकर यांनी दिला.
या आंदोलनात माजी नगरसेवक संजय वाबळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा सारिका नढे, छाया देसले, वर्षा जगताप, वेलफेअर पार्टीचे सालारभाई शेख, एमआयएमचे धम्मराज साळवे, प्रकाश जाधव, प्रदिप पवार, काशिनाथ नखाते, सुरेश गायकवाड, सतिश काळे, प्रविण कदम, नीरज कडू, सुनिता शिंदे, युवराज पवार उपस्थित होते.
Tags: आंदोलनउपचार दरवाढजनआंदोलनदरवाढ मागे घ्यापिंपरी चिंचवड महापालिकामहापालिका रुग्णालयराजकीय पक्षसामाजिक संस्था






















Join Our Whatsapp Group