पिंपरी (Pclive7.com):- गणपती बाप्पा मोरया.. मंगल मूर्ती मोरया.. चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या गणरायाचे बुधवारी उद्योगनगरीत आगमन झाले. ठिकठिकाणी मिरवणुकीद्वारे गणरायाला मोठ्या उत्साहात घरी आणण्यात आले. घरगुती गणपतींची सकाळी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दुपारनंतर गणरायाची प्रतिष्ठापना केली. वरुणाचा अभिषेक, गणेशक्तांच्या अभूतपूर्व उत्साहाने उद्योगनगरी गणेशमय झाली आहे. पाऊस पडल्याने गणेशभक्त सुखावले आहेत.
![](https://pclive7.com/wp-content/uploads/2022/08/IMG-20220817-WA0044-300x300.jpg)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दोन वर्षे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात आला होता. यावर्षी कोरोनाचे संकट कमी झाल्याने, निर्बंध उठल्याने पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत मोठा उत्साह दिसून आला. घरगुती गणपतीची स्थापना सकाळपासूनच सुरू होती. तर सार्वजनिक उत्सव गणेशोत्सव मंडळाना पुढील दहा दिवसांसाठी मोठा उत्साह संचारला असल्याचे दिसून आले.
ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक कोरोना निर्बंध हटल्यानंतर उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असल्याचे दिसून येत आहे. दुपारपर्यंत पावसाने उघडीप दिली. त्यामुळे गणरायाची मूर्ती घरी आणणे, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेतही गणेश भक्तांची लगबग दिसून आली. पहिल्या टप्प्यात गणेशभक्तांनी घरगुती प्रतिष्ठापना केली. बाप्पाची सजावट करण्यासाठी कुटुंबातील नागरिकांची धावपळ सुरु असल्याचे दिसून आले. दुपारनंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी मिरवणूक काढून बाप्पांची प्रतिष्ठापना केली.