पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातून ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर फी खरेदी विक्री व्यवहारांचे १/२ टक्का केल्याने शहरातील नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत आहे. तरी मालमत्ता हस्तांतर फी मध्ये केलेली वाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
राहुल कलाटे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या करसंकलन कार्यालयातून ३१ मार्च २०२२ नंतरच्या मालमत्ता हस्तांतर फी खरेदी विक्री व्यवहारांचे १/२ टक्का केल्याने शहरातील नागरिकांवरती मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड पडत आहे. तरी ह्या निर्णयाचा फेर विचार करून शहरातील नागरिकांना पूर्वी प्रमाणे करयोग्य मूल्याच्या ५ टक्के प्रमाणे आकारणी करून दिलासा देण्यात यावा. पूर्वी खरेदी विक्री द्वारे मालमत्ता हस्तांतरण करताना सुमारे २००० रुपये पर्यंत भरावा लागत होता. परंतु ३१ मार्च २०२२ नंतर हि रक्कम जवळजवळ २० पटींनी वाढल्यामुळे ह्या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा.
तसेच काही नागरिकांनी ३१ मार्च पूर्वी व्यवहार करून देखील त्यांना फक्त आपल्याकडे अर्ज नाही केला म्हणून १/२ टक्का रक्कम भरावी लागत आहे. करोना काळ तसेच जेष्ठ नागरिक व त्यांची मुले परदेशात असल्यामुळे त्यांच्या कडून नजर चुकीने जाहीर प्रकटनाकडे दुर्लक्ष झाल्या कारणाने त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे वरील हस्तांतर मूल्य तूर्तास ३१ मार्च २०२२ पूर्वी हस्तांतरित केलेल्या लोकांना पूर्वी प्रमाणे आकारण्यात यावा. जेणेकरून काही प्रमाणात शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल. तसेच हि अन्यायकारक करवाढ देखील लवकरात लवकर रद्द करण्यात यावी अशी मागणी राहुल कलाटे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.