पिंपरी (प्रतिनिधी):- प्रशस्त रस्ते असले तरी बेशिस्तपणे होणार्या पार्किंगमुळे पिंपळे सौदागरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज पाहणी दौरा केला. त्यांच्यासोबत सांगवी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे हे उपस्थित होते. यावेळी कोकणे चौकातील काही भाग ‘नो पार्किंग झोन’ करावा अशी सुचना नगरसेवक काटे यांनी केली.
पिंपळे सौदागर परिसराची गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे. दिवसेंदिवस या परिसरातील लोकसंख्या देखील वाढत आहे. प्रशस्त रस्ते असले तरी येथील वाहनांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यात या परिसरात मोठ मोठे मॉल्स, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स, शोरूमस् सुरू झाल्यामुळे संध्याकाळच्या वेळेला प्रचंड गर्दी वाढते. त्यातच या भागात आयटी कंपनीतील लोक मोठ्यासंख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मंडळींच्या शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी येथे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते.
दरम्यान, जगताप डेअरी चौकात गेल्या काही महिन्यांपासून ग्रेडसेपरेटर, उड्डाणपूलाचे काम आहे. त्यामुळे देखील या शिवार चौक, कोकणे चौक येथे वारंवार वाहतूक कोंडी होते. त्यामुळेच आज कोकणे चौक येथे होणाऱ्या बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी बाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि सांगवी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी पाहणी केली. यावेळी महापालिका आणि वाहतूक विभागाकडून कोकणे चौकातील काही क्षेत्र हे ‘नो पार्किंग झोन’ करावा अशी सूचना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी केले आहे.