पिंपरी (प्रतिनिधी):- महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्येही गुन्हा दाखल असणारा कुख्यात गुंड एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या जाळ्यात आला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ३ रिव्हॉल्वर आणि २० जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. प्रदिप बालगोविंद सिंग-परिहार (वय २७ रा. मुळ पिढोरी तहसील जि. आग्रा, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे यांना मिळालेल्या बातमीनुसार एक इसम मोशी, देहुफाटा येथे आला असून त्याच्या बॅगेमध्ये शस्त्र असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेवून त्याची बॅग तपासली असता त्याच्या बॅगेत ३ देशी बनावटीचे रिव्हॉल्वर व २० जीवंत काडतुसे असा ४७ हजार रुपयांची शस्त्रे जप्त करण्यात आली.
पोलीस तपासात प्रदिपवर २१ गुन्हे असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार त्याच्यावर उत्तरप्रदेश नोयडा येथे १० वाहन चोरीचे गुन्हे, राजस्थान येथे खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, महाराष्ट्रात नागपूर येथे व आंध्रप्रदेशात दोन असे पेट्रोल पंप लूट तर ठाणे येथे दरोड्याची तयारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र कदम, उत्तर प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त शशिकांत शिंदे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडीक यांच्या तपास पथकातील पोलीस हवालदार अजय भोसले, रविंद्र तिटकारे, पोलीस नाईक किरण काटकर, मोहन जाधव, पोलीस शिपाई नवनाथ पोटे, अमोल निघोट, करन विश्वासे, विशाल काळे, स्वप्नील लांडगे यांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बंबाळे करत आहेत.