पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरात सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. त्याचा तीव्र निषेध करत महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वात आज महापालिकेच्या मुख्यालयात कचरा टाकून लक्षवेधी आंदोलन केले.
गेल्या सात महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आली. मात्र सर्वच बाबतीत सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. सध्या शहरात प्रचंड घाणीचे साम्राज्य वाढले आहे. नियोजनाच्या अभावामुळे कचरा वेळच्यावेळी उचलला जात नाही. प्रशासनाला काहीही देणघेणं नसून थंडपणे झोपले आहे. शहरात डेंगू, स्वाईन फ्लूसह साथीच्या रोगाने थैमान घातले आहे. मात्र सत्ताधार्यांना क्याचे काहीच सोयरेसुतक नाही. त्याचाच निषेध करत आज मनसेने महापालिकेच्या मुख्यालयात कचरा टाकून आंदोलन केले. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देऊन लवकरात लवकर कचर्याबाबत ठोस उपाय योजना न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.