पिंपरी (Pclive7.com):- गोवर या संसर्गजन्य आजाराचे पिंपरी चिंचवड शहरात सद्यःस्थितीत रुग्ण आढळले नसल्याची माहिती महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली आहे. हा आजार होऊ नये, यासाठी पाच वर्षांपर्यंत गोवर- रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. पालकांनी ही लस आपल्या मुलांना दिली नसल्यास बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.

मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेण्याच्या सूचना महापालिका वैद्यकीय विभागाकडून देण्यात आल्या आहे. हा आजार होऊ नये यासाठी ९ महिन्यांचे बालक आणि १६ महिन्यांच्या बालकांना गोवर – रुबेला प्रतिबंधक लस दिली जाते. कोणत्याही कारणास्तव पालकांनी ही लस मुलांना दिली नसेल तरी पाच वर्षापर्यंत मुलांना ही लस देता येते.
सदर लसीकरण विशेषतः दर गुरुवारी तसेच महापालिका दवाखाना आणि रुग्णालयाने निश्चित केलेल्या ठिकाणी सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या कालावधीत मोफत उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये लक्षणे नसली तरीही बालकांचे लसीकरण करून घ्यावे, असे डॉ. साळवे यांनी स्पष्ट केले आहे. गोवर हा वेगाने पसरणारा आजार आहे. पॅरामिक्सो व्हायरसमुळे हा आजार होतो. हा विषाणू सर्वप्रथम श्वसनमार्गाला संक्रमित करतो.
गोवरची लक्षणे..
# अंगावर लाल पुरळ किंवा लाल रंगाचे रॅशेस येणे
# सुरुवातीला मुलांना खोकला आणि सर्दी ही लक्षणं दिसतात.
# तसेच डोळे लाल होऊ शकतात.
# बालकांमध्ये अशक्तपणा जाणवतो.
काय काळजी घ्यावी..
प्रामुख्याने पाच वर्षाखालील बालकांमध्ये हा आजार आढळत असल्याने कुटुंबीयांनी गोवरच्या लक्षणांवर लक्ष ठेवावे. मुलांना गोवरची लक्षणे असल्यास शाळेत आणि इतर कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी पाठवू नये. लहान मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसल्यास त्यांना तातडीने नजिकच्या महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवावे. घरच्याघरी उपचार किंवा हा आजार अंगावर काढू नये.






















Join Our Whatsapp Group