पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड शहरातील काही मंडळींनी एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडविले आहे. व्हॉटस्अँपच्या माध्यमातून मित्र झालेल्या ग्रुपने मिठाई, फटाके, किराणा सामान तसेच रोख रक्कम जमा केली. त्यानंतर भोसरी येथील स्नेहवन मधील वंचित चिमुकल्यांसोबत दिवाळी साजरी केली.
आजकाल व्हॉटस्अँपचा वापर बऱ्याचदा केवळ टाईमपाससाठीच होत असल्याचे आपण पहातो. परंतू याच व्हॉट्सअँपच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड मधील काही जणांनी सामाजिक बांधिलकीच दर्शन घडवले आहे. शहरातील विविध भागात राहणार्या तरूणांची एका हॉटेलमध्ये ओळख झाली. त्यात आयटी इंजिनिअर, व्यावसायिक, डॉक्टर, पत्रकार, हॉटेल मालक तसेच मोठ्या हुद्द्यावर नोकरी करणारे होते. दिड दोन वर्षापूर्वी झालेली ही ओळख कालांतराने मैत्रीत बदलली. मग काय या सर्वांनी मिळून व्हॉटस्अँपचा ग्रुप बनवला. त्यातून या दिवाळीत सर्वांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याचा निश्चय केला. सहाजिकच त्याला सर्वांनीच होकार देखील दिला. त्यानंतर कुणी ५०० कुणी, हजार तर कुणी दिड हजार रुपये जमा केले. २५ मित्र असलेल्या या ग्रुप मधल्या बहुतांश सदस्यांनी पैसे जमा केले. हे पैसे कोणाला द्यायचे हा विचार करत असतानाच शहरातच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या अशोक देशमाने यांच्या स्नेहवनचे नाव त्यांना सुचले. मग काय जमा केलेल्या पैशातून त्यांनी स्नेहवनसाठी किराणा माल खरेदी केला. शालेय वस्तू आणि मिठाईची देखील खरेदी केली. एवढंच नाही तर काही रोख रक्कमही स्नेहवनला ग्रुपच्या वतीने देण्यात आली. त्यावेळी या वंचित मुलांच्या चेहऱ्यावरचे समाधान अर्थातच या व्हॉटस्अँप ग्रुपच्या तरुणांना ही दिलासा देणार होते. स्नेहवनला व्हॉट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून मदत मिळाल्याने देशमाने यांनी ही आनंद व्यक्त केला आणि अनेकांनी यातून प्रेरणा घ्यावी अशी आशा व्यक्त केली आहे.






















Join Our Whatsapp Group