पिंपरी (प्रतिनिधी):- एरवी पिंपरी चिंचवड मधले सर्व स्थानिक नेते एकमेकांवर आरोप करण्यात दंग असतात. पण आज हे सर्व स्थानिक नेते एकत्र आले, निमित्त होतं दिशा सोशल फाउंडेशन आयोजित दिवाळी फराळाचे. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने शहरातले हे राजकीय फटाके एकत्र आले होते. पण यावेळी वेळेचे आणि प्रसंगाचे भान राखत या फटाक्यांनी एकमेकांवर वाजण्याचे काम केले नाही. पण कोपरखळ्यांनी ही मैफिल दिवाळीच्या फराळासारखी चांगलीच खुसखुशीत झाली.
पिंपरी चिंचवड शहरातील दिशा सोशल फांऊडेशन गेली कित्तेक वर्षे कार्यरत आहे. अनेक सामाजिक उपक्रम या फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविले जातात. या वर्षी दिवाळीचे औचित्य साधत दिशाने अगदीच हटके कार्यक्रम घेतला. शहरातील सर्वपक्षिय नेत्यांना एकत्र आणण्याची किमया या फाऊंडेशनने घडवून आणली. निगडी प्राधिकरणातील ‘हाॅटेल कृष्णा’ येथे सकाळी पार पडलेल्या दिवाळी फराळ कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर आझम पानसरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, शिवसेनेचे शहरप्रमुख राहुल कलाटे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य गजानन चिंचवडे, लोकमान्य होमिओपॅथी काॅलेजचे विश्वस्त निहाल पानसरे, वेणू साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहराच्या वाटचालीत महत्वपूर्ण योगदान असणाऱ्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एका व्यासपीठावर यावे, त्यांच्यामध्ये दिलखुलास संवाद घडावा. या हेतूने ‘दिवाळी फराळ’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वपक्षीय नेते दिवाळी फराळाला एकत्र येणे,हा उपक्रम शहरात पहिल्यांदाच संपन्न झाला. जवळपास अडीच तास रंगलेल्या या गप्पांच्या मैफलीत १९८६ ते २०१७ पर्यंतच्या विविध आठवणींना उजाळा देण्यात आला. धमाल किस्से व भन्नाट विनोदांच्या देवाणघेवाणीमुळे वातावरण खेळीमेळीचे झाले होते. एकमेकांची फिरकी घेण्याची संधी कोणी सोडली नाही. शहर विकासासाठी एकत्र येण्याची ग्वाही यावेळी नेत्यांनी आवर्जून दिली. यावेळी मान्यवरांना ‘दिशा एक प्रवास’ ही माहितीपुस्तिका व नितीन बानुगडे लिखित ‘यशाचा पासवर्ड’ हे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष गोरख भालेकर यांनी केले. सूत्रसंचालन समन्वयक नाना शिवले यांनी केले. आभार कार्याध्यक्ष सचिन साठे यांनी मानले. गुरूदास भोंडवे, विजय कांबळे, राजेंद्र करपे, भरत आल्हाट, संतोष निंबाळकर, अविनाश ववले, संतोष चांदेरे, श्याम अहिरराव, शरीफ शेख,अतुल शिंदे, नंदू कांबळे, मुकुंद काळभोर, समीर काळभोर, गणेश लंगोटे यांनी विशेष परीश्रम घेतले.






















Join Our Whatsapp Group