पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मुख्याधिकारी संवर्गातील हांगे यांची लातूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली असून अवघ्या साडेचार महिन्यात त्यांची पिंपरीतून बदली झाली आहे. बेदरकार कारभार, पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, पदाधिका-यांना दुरुत्तरे अशा विविध कारणांमुळे त्यांची साडेचार महिन्याची कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.
राज्याच्या नगर विकास विभागाने अच्युत हांगे यांच्या बदलीचा आदेश आज (मंगळवारी) जारी केला आहे. मुख्याधिकारी संवर्गाच्या ‘अ’ श्रेणीतील हांगे हे १ जुलै २०१७ रोजी पिंपरी चिंचवड महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर रुजू झाले होते. त्यांनी यापूर्वी नागपूर, नगर महापालिकेत उपायुक्त म्हणून तर भिवंडी-निजामपूर, मीरा-भार्इंदर या ‘ड’ दर्जाच्या महापालिकेत आयुक्त म्हणून कामकाज केले होते.
अतिवृष्टीच्या काळात मीरा-भाईंदरच्या महापौरांनी पाच वेळा मोबाईलवर संपर्क साधला असतानाही हांगे यांनी महापौरांचा फोन घेतला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या महापौरांनी हांगे यांची थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली होती. त्यामुळे त्यांची दीड वर्षांपूर्वी तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. गेले वर्षभर ते पदस्थापनेच्या प्रतीक्षेत होते. अखेर, एक जुलै रोजी त्यांची पिंपरी महापालिकेत वर्णी लागली होती.
पिंपरी महापालिकेतील साडेचार महिन्यांच्या काळात हांगे कायमच वादग्रस्त राहिले. स्थायी समितीत नगरसेवकांना दुरुत्तरे करणे, कनिष्ठांना शिवराळ भाषा वापरणे, गणेश विसर्जनाकामी नेमलेल्या पोलिस कर्मचा-याला धक्काबुक्की करणे आदी कार्यशैलीमुळे ते वादग्रस्त ठरले होते.





















Join Our Whatsapp Group