पुणे (प्रतिनिधी):- पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर आज सकाळी खासगी बस व ट्रकचा अपघात झाला. यामध्ये सुमारे २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक आहे.
खोपोली येथील मिल ठाकूरवाडी जवळ हा अपघात झाला. यामध्ये बसचे ( जीजे ११ टी १८१९) ब्रेक फेल होऊन पाठीमागून येऊन ट्रकला धडकली. बसमधील सर्व प्रवासी गुजरात राजकोटमधील असून ते शिर्डी, शनि-शिंगणापूर येथून दर्शन घेऊन मुंबई फिरण्यासाठी निघाले होते. पुण्याहून खोपोलीमार्गे मुंबईला जाताना सकाळी सातच्या सुमारास अचानक बसचे ब्रेक फेल झाल्याने बस अंडे वाहतूक करणा-या ट्रकला पाठीमागून जोरात धडकून रस्त्यावरच पलटी झाली. घटनेत २५ बस प्रवासी व ट्रक चालक जखमी झाले आहेत.
जखमींच्या हात, पाय, डोके या ठिकाणी जबर मार लागला आहे. जखमी प्रवाशांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये लहान मुले, महिलांचा समावेश आहे. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. अपघातामुळे जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक द्रूतगती मार्गे वळविण्यात आली होती.