पिंपरी (Pclive7.com):- स्मार्ट सिटी योजनेच्या एरीया बेस डेव्हलपमेंट प्रकल्पांतर्गत १३०० एकर जागेचा विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लागार संस्था नेमण्यात येणार असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अकरा नामांकित संस्थांनी स्वारस्थ दाखविले आहे. त्यापैकी एका संस्थेची निवड केली जाणार असून त्यांना सुमारे २१ कोटी रुपये मेहनताना दिला जाणार आहे.
स्मार्ट सिटी या महत्वाकांक्षी योजनेमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेचा समावेश झाला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प हा विभागनिहाय विकास आणि पॅन सिटी सोल्युशन्स या दोन घटकांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत १ हजार १४९ कोटी रूपयांची विकास कामे राबविण्यात येणार आहेत. विविध प्रकल्पाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. पॅन सिटी आणि एरिया बेस डेव्हलपमेंट उपक्रमासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करणे महापालिकेला बंधनकारक आहे. त्यामुळे महापालिकेने सल्लागार संस्था निवडीविषयक निविदा प्रक्रिया राबविली. या विषयीची निविदापूर्व सभा नुकतीच झाली. अध्यक्षस्थानी आयुक्त श्रावण हर्डीकर होते. कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे (सीओईपी) चे डॉ. प्रताप रावळ, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख नीळकंठ पोमण उपस्थित होते.
निविदापूर्व बैठकीस टाटा कन्सस्टींग इंजिनियरिंग लिमिटेड, पीडब्ल्यूसी, केपीएमजी, एन्कॉम, सीएचटूएम, डीआयएमटीएस, आयबीआय, इजीस, फीडबॅक अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यातील पीडब्ल्यूसी संस्थेकडे देशातील तेरा शहरांचा तर केपीएमटीकडे पाच शहरांचा सल्लागार म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. या संस्थांच्या प्रतिनिधींनी निविदापूर्व बैठकीत विविध सूचना केल्या आहेत. त्यांचा अंतर्भाव निविदेत केला जाणार आहे.
नीळकंठ पोमण म्हणाले, एरिया बेस डेव्हलेपमेंट उपक्रमात पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकडचा आणि कासारवाडीचा १३२० एकरचा भाग येतो. त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. या भागात रस्तेविकास, नाला सुधार, खेळाची मैदाने, हमरस्ता विकास, बीआरटीमधील बस थांबे निर्मिती अशी विविध कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत. कासारवाडी येथे बीआरटीएस, रेल्वे आणि मेट्रो अशी मल्टिमोड ट्रान्सपोर्ट सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामास सुरूवात होणार आहे. स्मार्ट सिटी एसपीव्हीचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या उपस्थितीत येत्या दहा नोव्हेंबरला संचालक मंडळाची बैठक होणार असल्याची माहिती नीळकंठ पोमण यांनी दिली.





















Join Our Whatsapp Group