पिंपरी (Pclive7.com):- श्वान घरात असलं की, संरक्षणाची हमी वाटते. त्याला माणसं देखील ओळखता येतात. मालकाची सेवाही तो चोख बजावतो. श्वानांचे आणि मालकांचे विशेष नाते असते, श्वास विशेष प्रशिक्षित असतात. हे सर्व काही पहायला मिळाले चिंचवडमध्ये आयोजित डॉग शोमध्ये. श्वानप्रेमी मोठ्या हिरीरीने डॉग शोमध्ये सहभागी झाले होते. देशभरातून आलेल्या श्वानप्रेमींनी डॉग चॅम्पिअनशिपसाठी कसरत केली. श्वानांची अनोखी दुनिया पाहून पिंपरी चिंचवडकरही थक्क झाले.
चिंचवड, वाल्हेकरवाडी येथील आहेर गार्डन येथे १०८ व १०९ वा आंतरराष्ट्रीय ऑल ब्रीड चॅम्पियन डॉग शो आयोजित केला होता. या शोमध्ये शहरवासियांना जवळपास ३६ प्रजातीचे श्वान जवळून पहावयास मिळाले. भारतीय श्वानाबरोबर परदेशी प्रजातीचे श्वान देखील यात सहभागी झाले होते. पिपंरी चिंचवड मधील हा दूसरा डॉग शो होता. सर्वजण वेगवेगळे श्वान पाहण्यात दंग झाले होते. बालचमू तर श्वानांना पाहून खुश झाले. जवळपास १२५ वर्षापासून महाराष्ट्रात डॉग शो चे आयोजन केले जात आहे. ही परंपरा पूना केनल फेडरेशनने शहरात जपली आहे.
डॉग शोमध्ये २७० डॉग सहभागी झाले होते. पाच महिन्यांपासून ते १० वर्षापर्यंतच्या श्वानांचा यामध्ये समावेश होता. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, लोणावळा, अहमदाबाद, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आदी जिल्हा व राज्यस्तरातून श्वानप्रेमींनी श्वानासोबत प्रदर्शनास हजेरी लावली होती. काही घरगुती श्वान पाळणाऱ्या श्वानप्रेमींनी देखील मोठ्या हौसेने आपल्या श्वानाला सजवून या शोमध्ये आणले होते. जवळपास १०० किलो वजन असलेले श्वान देखील या स्पर्धेत सहभागी होते. खासकरून महाराष्ट्रात आढळून न येणाऱ्या जातींना पाहण्यासाठी जास्त गर्दी जमली होती. यामधील काही श्वान हे चीन, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशातील होते. यावेळी श्वानाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. या शोमध्ये बाँम्ब शोधणे, रुमाल किंवा वस्तूच्या वासावरून माणसाला गर्दीत शोधणे, बॉडीगार्ड म्हणून काम करणे, चक्रातून उडी मारणे अशा कसरतींनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. बर्फाळ प्रदेशात आढळणारा सायबर हशमी हा डॉग या शोचे विशेष आकर्षण ठरला. श्वानांच्या देहबोलीपासून ते हावभाव आणि शरीराची ठेवण सर्व बाबींचे निरीक्षण करून गुणांकन करण्यात आले, अशी माहिती प्रशिक्षक अंजली वैद्य यांनी दिली.
यावेळी पूना केनल कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष संजय देसाई, सचिव एन. एस. पटवर्धन, संजीवनी पांडे उपस्थित होत्या. डॉग शोच्या परीक्षणासाठी डॉ. ओरलीनो होसाका (फिलीपीन्स), शरत शर्मा (गुडगाव), अंजली वैद (नवी दिल्ली) यांची नेमणूक करण्यात आली होती.