पिंपरी (Pclive7.com):- अवघ्या आठ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर मावळ तालुक्यातील इंदोरीच्या प्रगती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी फायर फायटींग, रिव्हर क्रॉसिंग, नेमबाजी, लाठी युद्ध, मनोरे यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केली उपस्थित पाहुणे मंडळींबरोबर पालकांच्याही काळजाचा ठोका चुकला, मात्र मुलांमधील हा लक्षणीय बदल पाहून त्यांची छाती अभिमानाने फुगली.
रोटरी क्लब ऑफ निगडीतर्फे शालेय विद्यार्थ्यांना संरक्षणाचे धडे देण्यासाठी इंदोरी येथील प्रगती विद्यामंदिर येथे ‘रायला’ या आठ दिवसीय विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या दिवसीय शिबिरामध्ये पाच ते १५ वयोगटातील सहभागी झालेल्या १०२ विद्यार्थी-विद्यार्थिनींना कमांड स्पेशल फोर्सकडून साहसी खेळांचे विविध २७ प्रकार शिकविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे युवा संचालक विकास टोपले, सहायक प्रांतपाल समीर गुप्ते, रायला चेअरमन प्रदीप बागूल, महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी प्रवीण भामरे यांच्यासह
रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, फर्स्ट लेडी मुग्धा कुलकर्णी, सचिव प्रवीण घाणेकर, युवा संचालक भूषण कुलकर्णी, मावळचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, इंदोरी शालेय समिती अध्य्क्ष दामोदर शिंदे, बबनराव ढोरे, मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे, पर्यवेक्षक बलभीम भालेराव, रियाज तांबोळी, कमांड स्पेशल फोर्सचे चीफ कमांडंट दादासाहेब सावंत, रोटरी क्लबचे रायला चेअरमन अरविंद खंडकर तसेच सुभाष जयसिंघानी, अजित कोठारी, दिनेश सहाकार, अर्जुन दलाल, प्रतिभा दलाल, अद्वैत दलाल, गुरुदीप सिंग, हरबिंदर सिंग, सुशील सहानी, सुधीर मित्रा, राणू सिंघानिया, गीता खंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी पथ संचलन, बंदूक चालविणे, लढाई कौशल्य, काठी चालविणे, मनोरे, आग बचाव तंत्र, धनुष्यबाण, दोर चढणे, अडथळा शर्यत, यांसारखी विविध प्रात्यक्षिके शौर्य प्रशिक्षण विद्यार्थ्यांनी सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण कुलकर्णी व वैजयंती कुल यांनी केले. मुख्याध्यापक दशरथ ढमढेरे यांनी आभार मानले.