पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात कचरा स्वच्छतेचे काम करणार्या तब्बल ४१ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांची सहकारी संस्थेकडे असलेली नोंदणी रद्द झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित संस्थांची नोंदणी रद्द करीत, यापुढे त्यांना महापालिकेमार्फत कोणतेही कामे देण्यात येऊ नये, असे आदेश काढले आहेत.
महापालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छताविषयक कामे स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून केली जातात. त्या संस्था सहकारी असल्याने पुणे सहकारी संस्थेच्या आखत्यारित येतात. सहकारी संस्था कायदा, नियम व उपविधीप्रमाणे संबंधित संस्थांनी पालन करणे आवश्यक आहे; मात्र संबंधित ४१ संस्थांनी या नियमाचे पालन न केल्याने त्यांची मान्यता ३१ मार्च २०१६ व ३१ मार्च २०१७ रोजी रद्द केली गेली आहे. त्यामुळे त्या संस्थांचे कायदेशीर अस्तित्व संपुष्टात आले आहे, असे पत्र सहकारी संस्थेचे उपनिबंधक प्रतीक पोखरकर यांनी महापालिकेस १० ऑगस्ट २०१७ ला पाठविले होते.
राष्ट्रवादीशी संबंधित ठेकेदार ‘टार्गेट’
पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तांतर होऊन भाजपची एकहाती सत्ता आली आहे. परिणामी, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या ठेकेदारांना या ना त्या कारणांनी ‘टार्गेट’ केले जात आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्याकडून कामे काढून घेतली जात आहे. टक्केवारी देणार्या ठेकेदारांना अभय दिले जात आहे, असा थेट आरोप विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी अनेकदा भाजप पदाधिकार्यांवर केला होता. त्याच पद्धतीने सदर ४१ स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करून त्यांच्याकडून कामाचा ठेका काढून घेतला जात आहे. सत्ताधार्यांची ही भूमिका अन्यायकारक असल्याची भावना संबंधित संस्थांच्या चालकांनी व्यक्त केली आहे.





















Join Our Whatsapp Group