पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडीतील राजवाडेनगर परिसरातील १८ मीटरचा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच पूर्णत्वाचा दाखला देणा-या कार्यकारी अभियंत्यास बडतर्फ करा अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप कस्पटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालातील स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी पदाचा व अधिकाराचा गैरफायदा घेत कामाच्या पूर्णत्वाचा दाखला दिला. त्यामुळे त्यांना तातडीने कामावरुन बडतर्फ करावे, अशी मागणी कस्पटे यांनी केली आहे. काळेवाडी मुख्य रस्ता ते राजवाडेनगरपर्यंत अठरा मीटर रस्त्याचे रुंदीकरण झाले असल्याची नोंद महापालिकेकडे आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार सदरचा रस्ता जागा हस्तांतर रखडल्यामुळे विजयनगरमध्ये केवळ तीनशे ते चारशे मीटरपर्यंत विकसित झाला आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांमध्ये या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या कामाची प्रशासकीय मान्यता २० मे २०१४ रोजी ५२ लाख ५० हजारांना देण्यात आली.
सहा महिन्याच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश १५ एप्रिल २०१५ रोजी देण्यात आले. त्यानंतर ठेकेदाराने रस्त्याचे काम सुरू केले. हे काम पंचवीस टक्के झाले असून, या कामाचे अंदाजपत्रक तयार करताना ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडील मानांकनानुसार योग्य व समाधानकारक असल्याचा दाखला ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद ओंबासे यांनी दिला आहे. त्यानंतर १४ ऑक्टोबर, २०१५ रोजी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता व कार्यकारी अभियंता यांच्या सह्या असलेले काम पूर्ण झाल्याचे दस्तऐवज आयुक्तांना देण्यात आले असून, त्यावर हे काम समाधानकारक व व्यवस्थित पूर्ण केल्याचे म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात तेथे डांबरी करणाचे काम झालेले नाही.
त्यामुळे संबंधित अभियंता ओंबासे यांना पदावरून बडतर्फ करण्यात यावे व काम होण्यापूर्वी कंत्राटदारास बोगस दाखला दिल्याने नियमानुसार पूर्णत्वाचा दाखला देऊन योजनेतून काढण्यात आलेली रक्कम पाच पटीने दंड म्हणून महापालिकेच्या कोषा विभागात जमा करावी अशीही मागणी संदीप कस्पटे यांनी केली आहे.