पिंपरी (Pclive7.com):- देहूरोडच्या हद्दीत किवळे गावाजवळ एका अज्ञात वाहनाला धडकून मोटारकारच्या झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत. दरम्यान, तिघांवर सोमाटणे फाटा येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
संजय नारायण दाऊतपुरे (रा. अमरावती), असे मयताचे नाव असून भीमराव दत्तोबा म्हसके (वय ५५), मनोज सुरेश बंडगर (वय ३०), सचिन उत्तरेश्वर साठे (वय २८, रा. सर्व काळेवाडी, पुणे) हे तिघेही गंभीर जखमी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास हे चौघे इंडिका कारने (एमएच १४, सीएक्स ९०२१) मुंबईवरून पुण्याला येत असताना देहूरोड येथे पार्क किवळे गावाजवळ त्यांच्या पुढे जाणा-या एका अज्ञात वाहनाला धडकून नंतर रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोखंडी कठड्यावर जाऊन आदळली. हा अपघात प्रचंड भयानक होता. जखमींना बाहेर काढणे शक्य नव्हते. त्यावेळी देवदूत रेस्क्यू टीमने कटरने कारचा पत्रा कापून जखमींना बाहेर काढले. तर राणी अँम्बुलन्सने जखमींना तात्काळ रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच संजय यांचा मृत्यू झाला. तर भीमराव, मनोज आणि सचिन हे तिघेही गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देहूरोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group