पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेने दररोज मिळणारे उत्पन्न अल्पमुदत ठेवींच्या (फिक्स डिपॉझिट) स्वरूपात विविध १२ ते १३ बँकांमध्ये ठेवल्याने, त्यातून पालिकेला व्याजापोटी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात ५० कोटी ११ लाख रुपये वाढीव उत्पन्न मिळाले आहे. यापूर्वी पालिका दररोज मिळणारे उत्पन्न चालू खात्यात जमा करत होती. हे पैसे खात्यांमध्ये निष्क्रिय पडून असायचे. त्यामुळे चालू खात्यातील रक्कम अल्प मुदत ठेवींमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिणामी पालिकेच्या ठेवींच्या व्याजावर वर्षाला कोट्यवधी रुपये मिळत आहेत.
महापालिका ही ‘श्रीमंत’ महापालिका समजली जात आहे. या महापालिकेला दररोज विविध कर व दिलेल्या सेवांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न प्राप्त होते. दररोज मिळणारे उत्पन्न पालिका विविध बँकांमध्ये चालू खात्यात जमा करते. त्यातून अधिकारी व कर्मचार्यांचे वेतन आणि विकास कामांसाठी लागणारा निधी खर्च केला जातो. महापालिकेला मिळणार्या उत्पन्नाव्यतिरिक्त केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रकल्पांसाठी कोट्यवधींचा निधी प्राप्त होतो. हा निधी लगेच खर्च होत नसल्यामुळे तो विविध बँकांमध्ये दीर्घ मुदत ठेवीच्या स्वरूपात ठेवला जातो.
पालिका बँकांमध्ये ठेवत असलेल्या मुदत ठेवींमुळे वर्षाला १५५ कोटी ८३ लाख १३ हजार ७२७ रूपये व्याज मिळत होते. दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न चालू खात्यामध्ये जमा करत असल्याने त्याचा महापालिकेला फायदा होण्याऐवजी संबंधित बँकांचा आर्थिक फायदा होत होता. त्यामुळे मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी अल्पमुदत ठेवींमुळे महापालिकेच्या उत्पन्नात चांगली भर पडेल, असा सल्ला दिला.
भाजप सत्ताधार्यांनी उत्पन्नात भर घालण्याच्या दृष्टीने दररोज मिळणारे उत्पन्नही अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात विविध बँकांमध्ये ठेवण्याच्या निर्णयास पाठबळ दिले. त्यानुसार महापालिकेच्या चालू खात्यांमधील जमा रक्कम अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात बँकांमध्ये ठेवण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.त्यासाठी महापालिकेने जाहिरात प्रसिद्ध करून विविध बँकांकडून ठेवींवर किती व्याजदर देणार याची माहिती मागविली होती. त्यातील जास्तीत जास्त व्याजदर देणार्या बँकांमध्ये अल्प मुदतीच्या ठेवी ठेवण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महापालिकेला अल्पमुदत ठेवींच्या माध्यमातून व्याजापोटी एकूण २०५ कोटी ८३ लाख १३ हजार ७२७ रुपये मिळाले आहेत. आजमितीला महापालिकेने विविध बँकांमध्ये एकूण २ हजार ९५७ कोटी ९२ लाख ८१ हजार रुपये अल्पमुदत ठेवींच्या स्वरूपात ठेवले आहे. त्यापोटी गेल्या आर्थिक वर्षात १५५ कोटी ८३ लाख १३ हजार ७२७ रुपयांचे व्याज मिळाले होते. यंदा त्यात वाढ होऊन ५० कोटी ११ लाख ८८ हजार १३२ रुपये वाढीव व्याज मिळाले आहे.