पिंपरी (Pclive7.com):- वाकड मधील एका कामाच्या मंजुरीच्या निमित्ताने आज पिंपरी महापालिकेत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार आणि शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्यात चांगलीच जुंपली. काही पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी मध्यस्थी केल्याने हे प्रकरण ‘हात घाई’ वर जाता जाता राहिले.
विधी समितीमध्ये वाकडच्या विकास कामसंबंधी एक विषय मंजूर करायचा होता, मात्र तो झाला नाही.त्याची विचारणा करण्यासाठी राहुल कलाटे विधी समिती अध्यक्ष शारदा सोनवणे यांच्याकडे गेले होते. मात्र त्यावेळी त्यांनी पक्षनेत्यांकडे बोट दाखवल्यावर कलाटे एकनाथ पवारांकडे गेले. अँटीचेंबर मध्ये बसलेल्या पवारांना त्यांनी याबाबत विचारणा केली. पण समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने संतापलेल्या कलाटे यांनी पवारांना चांगलेच सुनावले. पवार ही प्रतिकार करत होते, मात्र कलाटे भलतेच संतापले होते. सुदैवाने काही पदाधिकारी त्याठिकाणी आल्याने या दोन नेत्यांमधला वाद हातघाई पर्यंत जाता जाता राहिला. या पूर्वीही सर्वसाधारण सभेत कलाटे पवार यांच्यात संघर्ष झाला होता. पण आज झालेला संघर्ष हा अगदीच संतापाच्याभरात झाल्याने त्याची महापालिका वर्तुळात चर्चा रंगली होती.